'कडू कारलं तुपात तळल, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच...' कारले आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि फायदेशीर असले तरी, त्याच्या कडू चवीमुळे ते खाणे अनेकांना आवडत नाही. विशेषतः घरातील लहान मुले किंवा काही मोठी माणसे देखील कारल्याची भाजी खाताना नाक मुरडतात. कितीही प्रयत्न केले तरी भाजीतील कडवटपणा पूर्णपणे जात नाही, ज्यामुळे ती डब्यातून किंवा ताटातून तशीच परत येते. कारलं चवीला कडू जरी असलं तरी त्याचे तितकेच वेगवेगळे चविष्ट, चमचमीत पदार्थ देखील तयार करता येतात(Bitter Gourd Recipe Karlyache Kaap).
कारल्याच्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी चटपटीत, चमचमीत काप तर सगळ्यांच्या विशेष आवडीचे... कारल्याची भाजी न आवडणारे देखील हे कारल्याचे काप अगदी पटापट खाऊन फस्त करतील इतके चवीला अप्रतिम लागतात. घरात जर मस्त, छान हिरवीगार कारली असतील आणि त्याची भाजी करायची नसेल तर, हा झटपट होणारा चटपटीत, चमचमीत पदार्थ करु शकता. कारल्याचे काप खायला इतके चविष्ट आणि कुरकुरीत लागतात की पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात. खमंग कारल्याचे काप एकदा नक्की करुन पहा तुम्हाला नक्कीच आवडतील. कारल्याचे कुरकुरीत, मसालेदार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. कारले - १ कप
२. मीठ - चवीनुसार
३. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
४. पाणी - गरजेनुसार
५. आलं - लसूण पेस्ट - १/२ टेबलस्पून
६. लाल - तिखट मसाला - १ टेबलस्पून
७. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
८. जिरे पावडर - १ टेबलस्पून
९. हळद - १/२ टेबलस्पून
१०. धणेपूड - १/२ टेबलस्पून
११. हिंग - चिमूटभर
१२. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१३. बारीक रवा - १ कप
१४. तांदुळाचे पीठ - १/२ कप
१५. तेल - तळण्यासाठी
घरी लहानशा कुंडीत लसूण लावण्याची १ युक्ती, हिवाळ्यात उंदियोसह चटणीसाठी घरीच मिळेल ताजी लसणाची पात...
कृती :-
१. सगळ्यांतआधी कारली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. मग कारली उभी चिरून त्यांचे उभे काप करून घ्यावेत, कारल्याच्या मधील बिया काढून घ्याव्यात.
२. हे कारल्याचे काप एका बाऊलमध्ये घेऊन त्यात लिंबाचा रस व मीठ घालून कापाला लावून घ्यावे. मग झाकण ठेवून १५ मिनिटे तसेच ठेवावे.
३. १५ ते २० मिनिटांनंतर कारल्याच्या या कापात पाणी घालून ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावे, यामुळे त्याचा कडवटपणा निघून जातो.
४. हे कारल्याचे काप एका बाऊलमध्ये घेऊन त्यात आलं - लसूण पेस्ट, लाल - तिखट मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, जिरे पावडर, हळद, धणेपूड, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर असे सगळे जिन्नस घालावेत. मग सगळे मिश्रण एकजीव करून हा मसाला कारल्याच्या कापांना लावून घ्यावा.
५. एका बाऊलमध्ये बारीक रवा, तांदुळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद व चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे.
६. मसाल्यात घोळवून ठेवलेले कारल्याचे काप य रव्याच्या तयार मिश्रणात घोळवून त्यावर मस्त असे रव्याचे कोटिंग तयार करुन घ्यावे.
७. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात हे कारल्याचे काप शॅलो फ्राय करून घ्यावेत. दोन्ही बाजुंनी हे काप खरपूस असे शॅलो फ्राय करून घ्यावेत.
कारल्याचे गरमागरम, कुरकुरीत असे चविष्ट, खमंग काप तयार आहेत. गरमागरम साध्या वरण - भातासोबतही हे चटपटीत, मसालेदार काप खायला चविष्ट लागतात. कारल्याची भाजी न खाणारे देखील हे काप अगदी आवडीने चव घेत पोटभर खातील.
