संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी होणारी भोगी आणि तिच्यासोबत केली जाणारी भाजीची खिचडी, हा महाराष्ट्रातील एक खास पारंपारिक पदार्थ आहे. हिवाळ्यातील भाज्या, तांदूळ आणि डाळ यांचा संगम असलेली ही खिचडी पौष्टिक तर असतेच, पण घरगुती चवीचं प्रतीकही मानली जाते. पण अनेकदा ही खिचडी करताना भात चिकट होतो, भाज्या अतिप्रमाणात शिजतात. ज्यामुळे ती खाण्यासाठी अधिक चविष्ट लागत नाही. इतकच नाही तर खिचडीची मजा देखील निघून जाते. छोट्या चुका टाळल्या तर खिचडी अगदी मऊ-मोकळी आणि परफेक्ट होते.
भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, भोगीची मिश्र भाजी आणि गरमागरम खिचडी. पण खिचडी करताना भात मोकळा झाला नाही, तर त्यात घातलेल्या भाज्यांची चवही नीट लागत नाही. म्हणूनच, आज आपण अशा २ टिप्स पाहणार आहोत ज्याने आपली खिचडी आजीच्या हातासारखी चविष्ट आणि सुटसुटीत होईल. ही पारंपरिक रेसिपी करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
तिळाचे लाडू दगडासारखे कडक होतात- तुटतच नाही? गूळ निवडण्यासाठी ४ टिप्स-लाडू मऊ खुसखुशीत
साहित्य
तांदूळ - दीड वाटी
मुगाची डाळ - १/४ वाटी
सुके खोबरे - २ चमचे
लसणाची पात - २ चमचे
भाजलेला हुरडा - २ चमचे
टोमॅटो- २ मध्यम
गाजराचे तुकडे - १/४ वाटी
वांगी- १/४ वाटी
बटाटा- १/४ वाटी
ताजा मटार -१/४ वाटी
घेवडा- २ टेबलस्पून
पावट्याच्या बिया -२ टेबलस्पून
चिरलेला पालक- १/२ वाटी
आंबट चुका- १/२ वाटी
मेथी- १/२ वाटी
तेल- ३ चमचे
मोहरी- १/२ चमचा
जिरे- १/४ चमचा
हिंग -१/२ चमचा
पातीचा ताजा कांदा चिरून- १/२ वाटी
पांढरे तीळ- २ चमचे
शेंगदाणे- २–३ टेबलस्पून
हळद- १/२ टीस्पून
कांदा लसूण मसाला- १ टीस्पून
हिरवी मिरची उभी चिरून- २ते ३
पाणी- ३–४ वाटी
मीठ- चवीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सुके खोबरे, लसूण आणि त्याची पात, हुरडा पाणी न घालता त्याची जाडसर पेस्ट करुन घ्या.
2. यानंतर तांदूळ आणि डाळ एकत्र करुन स्वच्छ धुवून घेतली. आता कढईत गरम करुन त्यात तेल घाला. नंतर जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि तयार केलेल वाटण घालून मंद आचेवर परतवून घ्या. त्यात पातीचा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तीळ, शेंगदाणे घालून पुन्हा परतवून घ्या. यात सगळ्या भाज्या, हिरव्या मिरच्या घाला.
3. वरुन लाल तिखट, कांदा- लसूण मसाला आणि मीठ घालून चांगले परतवून घ्या. यात डाळ आणि तांदूळ घालून पुन्हा परतवून घ्या. त्यात वरुन गरम पाणी घाला. उकळी आल्यानंतर गॅस मंद करुन झाकून ठेवा. भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित शिजू द्या. वरुन तूप आणि कोथिंबीर घाला. तयार होईल भोगीची भाज्यांची झणझणीत खिचडी.
