Join us  

Ashadhi Ekadashi Upvas Recipes : आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावं ? कोणते पदार्थ खायचे - कोणते न खाणेच योग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 3:54 PM

Ashadhi Ekadashi Upvas Recipes : एकादशी अन् दुप्पट खाशी असं तुम्ही ऐकूनच असाल. म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी उपवासाचे पदार्थ दाबून खातो.

आषाढी एकादशी ३ दिवसांवर येऊन ठेपली.   (Ashadhi Ekadashi 2022) एकादशीचा उत्साह जवळपास दोन ते तीन महिन्यांपासूनच असतो. कारण या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. खरंतर पोटाला आराम देण्यासाठी एकादशीचा उपवास केला जातो. (Ashadhi Ekadashi) पण एकादशी अन् दुप्पट खाशी असं तुम्ही ऐकूनच असाल. म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी उपवासाचे पदार्थ दाबून खातो. या लेखात तुम्हाला उपवासाच्या दिवशी खाता येतील आणि झटपट घरी बनवता येतील असे काही पदार्थ सांगणार आहोत.  जेणेकरून उपवासामुळे होणारं पित्त, एसिडीटी टाळता येईल (Ashadhi Ekadashi Upvas Recipes)

१) राजगिरा

उपवासाला राजगिरा खाण्याचे महत्व आहे. तुम्ही राजगिऱ्याचे लाडू किंवा दुधात राजगिरा मिक्स करून खाऊ शकता किंवा  राजगिऱ्याची खिचडी, खीर हे सु्द्धा उत्तम पर्याय आहेत.  राजगिरा पचायला हलके असते. त्यात फायबर्सचे प्रमाणही  असते. त्यामुळे शरीराला ते बाधत नाही. याशिवाय तुम्ही राजगिर्याच्या पीठाचे थालीपीठही खाऊ शकता.

२) भगर

वरीचे तांदूळ म्हणजेच भगर किंवा याची भाकरी एकादशीला हमखास केली जाते. वरीच्या तांदळात फायबर्स खूप असतात. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखं वाटतं. यात तुम्ही शेंगदाणे, काजू आवडीनुसार घालू शकता. याच्या सेवनानं तुम्हाला एसिडीटीचा त्रास नक्कीच होणार नाही. 

पावसाळ्यात चहात घालाच या 5 पैकी 1 तरी मसाला, गरमागरम चहाची चव दुपटीने वाढेल

३) फळं

उपवासाच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुम्ही दिवसाची सुरूवात फळांपासून करू शकता. सफरचंद, डाळिंब, केळी, फणस ही फळं खाल्यास तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटेल.  थकवा, अशक्तपणा येणार नाही. याशिवाय तुम्ही फळांचा रससुद्धा घेऊ शकता. फळ खाताना ती सालीसकट खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यातील पोषक तत्व तुम्हाला मिळतील. 

उरलेल्या भातापासून बनवा कुरकुरीत भजी; रेसिपी सोपी आणि भरपावसात चहासोबत नाश्ता भारी

४) कंदमुळं

तुम्ही उपवासाच्या दिवशी रताळे किंवा बटाटे खाऊ शकतं. काहीजण साबुदाण्याच्या खिचडीत बटाटा घालून खातात तर काहींना बटाट्याची तिखट, मीठ आणि  दाण्याचे कुट घातलेली भाजी आवडते. याशिवाय तुम्ही आवडीनुसार गुळ किंवा साखर घालून शिजवलेल्या रताळ्याचा शीरा करू शकता. यामध्ये भरपूर पोषकतत्व आणि फायबर्स असतात. कंदमूळे खाण्याने तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटते याशिवाय अपचनही होत नाही.

५) सुकामेवा उपवासाच्या दिवशी तुम्ही भिजवलेले बदाम,  अंजीर किंवा मनुके, अक्रोड खाऊ शकता. सुकामेवा घरात नसेल तर तुम्ही शेंगदाणेही उकळून त्याला तिखट मीठाची फोडणी देऊन खाऊ शकता. यात भरपूर पोषक तत्व असतात.  किंवा उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही आवडीनुसार अंजीर, काजू, बदाम घालू शकता. बदाम घालून दूध पिऊ शकता. हे दूध पिऊन दिवसाची सुरूवात केल्यानं तुम्हाला दिवसभर एनर्जेटीक वाटेल. 

उपवासाच्या दिवशी तांदूळ, चपाती, वांगी खाणं टाळा याशिवाय मासांहारही टाळा. पचायला जड असणारे पदार्थ खाऊ नका. बाहेरचे तळलेले पदार्थ टाळा. कारण पावसाळ्यात बाहेरचं खाल्ल्यानं तुम्हाला आजारांचा सामना करावा लागू शकतो.  शक्यतो घरी शॅलो फ्राय केलेले पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या. पावासाळ्यात लस्सी, ताक अशी थंड पेय घेणं टाळा.

टॅग्स :आषाढी एकादशीआषाढी एकादशीची वारी 2022