Join us

बदामाचा हलवा करण्याची सोपी पद्धत, ‘असा’ शाही हलवा गणपतीच्या प्रसादासाठी हवाच! आवडेल सर्वांनाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 15:29 IST

An easy way to make almond halwa, a must recipe for Ganpati's prasad! : झटपट करा बदामाचा असा हलवा. करायला सोपा आणि चव एकदम मस्त.

बदामाचा हलवा हा एक फार लोकप्रिय असा पदार्थ आहे. गोड शिरा सगळे आवडीने खातात तसेच जरा हटके काही खायचे असेल तर हा बदामाचा हलवा करायला काहीच हरकत नाही. (An easy way to make almond halwa, a must recipe for Ganpati's prasad!)प्रसादासाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे. थोडा खाल्ला तरी मन आणि पोट दोन्ही भरते. जिभेवर ठेवतात विरघळेल असा लुसलुशीत हलवा. पाहा कसा करायचा.  

साहित्य बदाम, साखर, पाणी, केशर, दूध, तूप, गव्हाचे पीठ 

कृती१. बदाम भिजत ठेवायचे. रात्रभर भिजवायचे म्हणजे चव जास्त छान लागते. रात्रभर नाही तर किमान तीन तास तरी भिजवायचेच. बदामाची सालं काढायची. भिजवल्यामुळे पटकन निघतात. बदाम मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याची पेस्ट वाटून घ्यायची. त्यासाठी त्यात वाटूभर दूध घालायचे. छान एकजीव पेस्ट तयार करायची. जरा पातळ ठेवा. अगदीच घट्ट नको. 

२. साखरेचा पाक करत ठेवायचा. त्यासाठी एका कढईत साखर घ्यायची. त्याच प्रमाणात पाणीही घ्यायचे. पाक छान एकतारी करायचा. त्यात केशर घालायचे. नाही घातले तरी हरकत नाही. साखरेचा पाक तयार झाल्यावर बाजूला ठेवायचा आणि दुसऱ्या कढईत तूप घ्यायचे. तूप जरा गरम झाले की त्यात चमचाभर गव्हाचे पीठ घालायचे. त्यामुळे हलवा छान रवाळ आणि घट्ट होतो. पाणचट लागत नाही. सगळे पदार्थ एकजीव होतात. 

३. पीठ जरा परतले की त्यात बदामाची पेस्ट घाला आणि छान परतून घ्या. बदामाचा हलवा आटायला लागेल. जरा सुका होईल आणि मग त्याला तूप सुटायला लागेल. तोपर्यंत ढवळत राहा. छान परतल्यावरच हलवा चविष्ट होतो. पेस्ट जरा आटली की त्यात तयार केलेला साखरेचा पाक ओतायचा. ढवळायचे आणि एकजीव करायचे. एकदम मस्त हलवा तयार होतो. छान मऊसर हालवा गरमागरम खायला घ्यायचा.  

इतरही विविध पद्धतीने बदाम हलवा केला जातो. सगळ्याच पद्धती छान असतात एकदा ही पद्धत वापरुन पाहा. कमी कष्टात मस्त पदार्थ करा. 

टॅग्स :गणेश चतुर्थी रेसिपीगणेशोत्सव 2025अन्नपाककृती