महाराष्ट्रीयन थाळी किंवा जेवणाचे ताट म्हटलं की, वरण - भात हा त्यातलाच अविभाज्य पदार्थ... आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटातील वरण - भात हा पदार्थ साधेपणा आणि पौष्टिकतेचा उत्तम मेळ साधतो. परंतु अनेकदा तोच तो वरण - भात खाऊन फारच कंटाळा येतो. अशावेळी, चवीत थोडा बदल करण्यासाठी आणि जेवणाला एक खास चव देण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आंबट वरण... आंबट वरण हा एक पारंपारिक आणि अत्यंत चविष्ट पदार्थ आहे, यात आंबटपणा चिंच किंवा कोकम वापरून जो नैसर्गिक आंबटपणा येतो तो अप्रतिम लागतो. तिखटपणा आणि आंबटगोड चवीमुळे हे आंबट वरणं चवीला फारच भन्नाट आणि अप्रतिम लागते. उत्तम चवीचे आंबट वरण नुसते पचायला हलके नसते, तर चवीलाही खूप छान लागते. हे वरण नुसत्या गरमागरम भातासोबतच नाही, तर पोळी किंवा भाकरीसोबतही अप्रतिम लागते(Ambat Varan Reciep).
साध्या डाळीला चिंचेच्या आंबटपणाची आणि फोडणीच्या खमंग सुवासाची जोड मिळाली की अगदी कमी साहित्यांत तयार केलेला हा पदार्थ जेवणाची रंगतच वाढवतो. चपाती, भात किंवा गरम भाकरीसोबत आंबट वरण (How To Make Ambat Varan At Home) म्हणजे खरे कम्फर्ट फूड. पारंपरिक पद्धतीने खमंग आणि चविष्ट आंबट वरण कसं तयार करायचं, त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात.
साहित्य :-
१. पिवळी मूग डाळ - १ कप
२. लसूण पाकळ्या - ३ ते ४ पाकळ्या
३. लाल सुक्या मिरच्या - २ ते ३ सुक्या मिरच्या
४. कोकम - ३ ते ४
५. तेल - २ ते ३ टेबलस्पून
६. मोहरी - १/२ टेबलस्पून
७. हिंग - १ टेबलस्पून
८. हळद - १/२ टेबलस्पून
९. पाणी - गरजेनुसार
१०. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
कृती :-
१. एका भांडयात पिवळी मुगाची डाळ घेऊन ती ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
२. मग ही पिवळी मुगाची डाळ प्रेशर कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवून घ्या.
३. कुकरमध्ये शिजवून घेतलेली पिवळी मुगाची डाळ चमच्याने हलकेच दाब देत थोडी मॅश करून घ्यावी.
४. एका भांडयात तेल घेऊन ते हलकेच गरम करून घ्यावे. गरम तेलात थोडेसे हिंग, मोहरी, हळद, लाल सुक्या मिरच्या, लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात.
५. या खमंग फोडणीत शिजवून घेतलेली पिवळी मुगाची डाळ घालावी, गरजेनुसार पाणी घालून कन्सिस्टंसी व्यवस्थित करून घ्यावी.
६. मग या डाळीत चवीनुसार मीठ, साखर घालावे. डाळीला हलकीच एक उकळी काढून घ्यावी.
७. सगळ्यात शेवटी यात कोकम घालावे आणि मंद आचेवर पुन्हा एकदा हलकीशी उकळी काढून घ्यावी.
८. डाळ १० ते १५ मिनिटे व्यवस्थित शिजल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी.
मस्त आंबट - गोड चवीचे गरमागरम आंबट वरण खाण्यासाठी तयार आहे. वाफाळता पांढराशुभ्र भात किंवा चपातीसोबत आपण हे आंबट वरण अगदी चवीने खाऊ शकता.
