उन्हाळा सुरू झाला की बाजारात हिरव्यागार कैऱ्यांची लगबग सुरू होते. कैरीचं पन्हं, चटणी आणि लोणचं तर आपण करतोच, पण वर्षभर विविध पदार्थांना आंबट-चटपटीत चव देण्यासाठी लागणारी 'आमचूर पावडर' जर घरीच तयार केली तर?
बाजारच्या आमचूर पावडरमध्ये अनेकदा भेसळ असते किंवा ती हवी तशी आंबट नसते. घरच्या घरी शुद्ध आणि सुवासिक आमचूर पावडर कशी करायची, याची स्टेप-बाय-स्टेप रेसिपी दिली आहे, त्यानुसार ट्राय करा.
स्वयंपाकात आमचूर पावडरचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. छोले असोत, भेळ असो किंवा एखादी भाजी, आमचूर पावडर चव दुप्पट करते. ही पावडर घरी तयार करणे अतिशय सोपे आणि स्वस्त आहे.
साहित्य :
कैऱ्या: २-३ किलो (चांगल्या आंबट आणि कडक कैऱ्या निवडाव्यात).
कृती
१. कैऱ्यांची निवड आणि स्वच्छता: सर्वात आधी कडक आणि मोठ्या आकाराच्या कैऱ्या घ्या. त्या स्वच्छ धुवून घ्या आणि पूर्णपणे कोरड्या करा. (कैरीमध्ये ओलावा राहिल्यास पावडर खराब होऊ शकते).
२. साल काढणे: एका सोलाण्याने (Peeler) कैरीची वरची हिरवी साल काढून टाका.
३. पातळ फोडी करणे: आता या कैरीच्या पातळ चकत्या किंवा फोडी करून घ्या. फोडी जितक्या पातळ असतील, तितक्या त्या लवकर वाळतील. तुम्ही किसणीने कैरी किसूनही घेऊ शकता.
४. उन्हात वाळवणे: चिरलेल्या कैरीच्या फोडी एका सुती कपड्यावर किंवा प्लास्टिकवर पसरवा. या फोडी कडक उन्हात किमान २ ते ३ दिवस वाळू द्या. फोडी हाताने तोडल्यावर 'कट्ट' असा आवाज आला की समजावे की त्या पूर्ण वाळल्या आहेत.
५. पावडर तयार करणे: पूर्णपणे वाळलेल्या कैरीच्या फोडी मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. वाटताना त्यात थोडे मीठ घातल्यास पावडर जास्त काळ टिकते.
६. चाळून घेणे: तयार झालेली पावडर चाळणीने चाळून घ्या, जेणेकरून त्यात मोठे तुकडे राहणार नाहीत. उरलेले तुकडे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या.
आमचूर पावडर वर्षभर टिकवण्यासाठी काही 'प्रो-टिप्स':
तयार झालेली आमचूर पावडर एका काचेच्या हवाबंद (Air-tight) बरणीत भरून ठेवा.
पावडर काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा.
शक्यतो 'गावरान' कैऱ्यांचा वापर करा, ज्यामुळे पावडर जास्त आंबट आणि चविष्ट होईल.
Web Summary : Make pure, flavorful amchur powder at home using raw mangoes. Simply slice, dry under the sun, grind and store airtight. Enjoy year-round!
Web Summary : कच्चे आम से घर पर शुद्ध आमचूर पाउडर बनाएं। बस स्लाइस करें, धूप में सुखाएं, पीसें और एयरटाइट स्टोर करें। साल भर आनंद लें!