Join us

कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी ८ टिप्स, नावडतं कारलंही होईल आवडत-ं भाजी अशी चमचमीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 21:17 IST

Easy Tips To Remove Bitterness From Karela Or Bitter Gourd : तुपात तळा नाहीतर साखरेत घोळा कारलं कडू ते कडूच, असं कोण म्हणतं? कारल्याची भाजी कडू लागणारच नाही,लक्षात ठेवा ८ टिप्स

कडू कारलं जितकं आरोग्यासाठी चांगलं तितकंच ते जिभेच्या चवीसाठी नको नको वाटत. जेव्हा आपण कारल्याची भाजी करतो तेव्हा भाजीतल्या कडूपणाची चव नकोशी वाटते. कारल्याचा हा कडूपणाच कारलं खाण्याची इच्छा संपवून टाकतो. कारलं खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. शरीरातील सर्व अवयवांचं कार्य सुरळीत चालण्यासाठी कारलं खाण्याला महत्व दिल जात. कारल्यात अ, क ही जीवनसत्वं, फायबर, लोह हे पोषक घटक असतात. कारल्यातील सर्व घटकांचा फायदा होण्यासाठी आहारात कारल्याचा समावेश करणं गरजेचे असल्याचे आहारतज्ज्ञ म्हणतात.

कारलं फक्त खायला कडू आहे म्हणून फक्त लहान मुलंच नाही तर मोठी मंडळीही कारलं खाणं टाळतात. कडूपणामुळे, कारलं अनेकांच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या यादीतून बाहेर पडत. पण कारलं कडूच लागतं हे सत्य आपण बदलू शकतो. यासाठी कारलं तुपात तळण्याची आणि साखरेत घोळण्यची अजिबात गरज नाही. कारल्याची भाजी करताना काही युक्त्या वापरल्यास कारल्याचा कडूपणा कमी होवून कारल्याची भाजी आवडीने खाल्ली जाईल अशी बनवता येऊ शकते(8 Easy Tips To Remove Bitterness From Bitter Gourd).

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी... 

१. कारल्याचा कडूपणा त्यांच्या बियांमध्ये सर्वाधिक असतो. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून शिजवा. रस बनवताना बिया काढल्यानंतर कारल्याचा वापर करा त्यामुळे त्याला कडू चव लागणार नाही किंवा खूप कमी लागेल.

२. मीठ कारल्याचा कडूपणा पूर्णपणे काढून टाकू शकते. किंबहुना, मिठातील खनिजे कारल्याचा कडू रस काढून टाकतात. कारल्याला मीठ लावून २०-३० मिनिटे ठेवा. असे केल्याने सर्व कडू रस बाहेर येईल. याशिवाय कारले सोलून शिजवून घ्या. यामुळे अधिक कडूपणा जाणवणार नाही.

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...

३. कारल्याची भाजी करताना कारल्याचे छोटे छोटे तुकडे करावेत. चिरलेल्या कारल्यात दही घालून ते नीट मिसळून घ्यावं. एक तास दह्यात कारल्याचे तुकडे ठेवल्यानंतर ते फोडणीस घातले तर कारल्याचा कडूपणा दूर होतो. 

४. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारलं सोलून, कापून घ्यावं. कारल्यावर थोडं मीठ आणि कणीक टाकावं. एक तासाने कारल्याचे तुकडे पाण्याने धुवून मग फोडणीस घालावेत. 

भेंडी हिरवीगार ताजी राहावी म्हणून ४ सोप्या टिप्स, फ्रिजमध्ये ठेवून भेंडी काळी पडणार नाही-सुकणार नाही...

५. कारल्याची भाजी करताना त्यात कांदा, बडिशेप आणि शेंगदाणे या घटकांचा वापर अधिक करावा. हे सर्व घटक कारल्यातील कडूपणा कमी करण्यास मदत करतात. 

६. कारल्याची भाजी केल्यावर ती परतून गॅस बंद करण्यापूर्वी त्या भाजीत थोडा गुळ टाका. गुळाचा गोडवा कारल्याचा  कडूपणा कमी करेल.

महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

७. कारल्याची भाजी करताना ती तव्यावर चांगली परतून घ्या. या पद्धतीने भाजी कोरडी होईल त्यामधील रस सुकून गेल्यामुळे आणि कारली चांगली परतली गेल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होईल.

८. कारले उभे चिरून तांदळाच्या पाण्यात भिजत ठेवल्यास कारल्याचा कडूपणा कमी होतो.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स