पावसाळ्यात कुणी रोमॅण्टिक होतं तर कुणी विरह गीत गातं. लगी आज सावन की फिर वो लडी है.. म्हणत काहीबाही आठवतं. पण पावसात एक गोष्ट सर्वांना आठवते ती म्हणजे भजी. खरंतर आता सर्वत्र वर्षभर चहा आणि भजी मिळतात. वडापावचाच हा सोबती. पण भजी म्हणजे नुसतं पोट भरणं नाही. भजी म्हणजे मूड आणि सोबत असलेल्या माणसांमुळे जमलेली आनंदाची मैफल. बाकी सगळीकडे भजी मिळतातच टपरीवर. मुंबईत मात्र भजी पाव मिळतो. भजीपावमध्ये बटाटा भजी आणि चटणीच असते. पण मुंबईतली अजून मस्त भजी म्हणजे खेकडा भजी.
वडापाव मुंबईवर राज्य करत असला तरी भजीपावही त्यात आपला आब आणि रुबाब राखून आहे. अनेक दर्दी खाणारे कांदा/बटाटा भजी,जोडीला अंगार मिरची पावात भरून खातात.
आणि पावसाळ्यात मात्र आवडतात खेकडा भजी. आता भजीला कुणी खेकडा का म्हणत असेल ते आपल्याला माहिती नाही. पण खेकडा भजी हा खरंतर तसा मुंबईकरांचाच कॉपीराईट. अस्सल मुंबई कांदा भजी बाहेरून कुरकुरीत,आतून मऊ असतात. ज्यांना आवडतं ते ही खेकडा भजीही पावात भरुन खातात. पण खेकडा भजींना बाकी कुणाची सोबत नसली तरी चालते. चटणीही नकोच. कपभर चहा सोबत असला म्हणजे तिखट लागलेलं असताना गरम चहा पिण्याची मजाच भर पावसात काही और.
खरे तर भजी पाव ही मुंबईच्या रस्ता खाण्याची ओळख असायला हवी इतकी ही जोडी लोकप्रिय आहे. आजकाल ओनियन रिंग्ज म्हणून एक बुळबुळीत प्रकार मिळतो. पण ते खाण्याचं पातक करत असाल तर तुम्ही काही अस्सल खवैय्ये नाही. पावसाळ्यात आणि गाडीवर भजी खाताना त्या रिंग्ज नाही आपली खेकडा भजीच मस्त. हाडाच्या मुंबैकरला भारी वाटायला एवढं सारं पुरे. सोबत एक कटिंग चहा. की लागतात माणसं कामाला.
मग पावसाळ्यात मुंबईत पाणी भरो, गाड्या लेट होवोत नाहीतर सगळी चिकचिक म्हणून चिडचिड होवो.. भजी-चहा मारला की झालाच मूड नीट!