Join us  

सूर्यनमस्कार कोणी-कधी- कसे करावेत? मनाला वाट्टेल तेव्हा घातले सूर्यनमस्कार तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 3:26 PM

सूर्यनमस्कार हा उत्तम व्यायाम आहे, मात्र नमस्कार घालण्याचं शास्त्रही शिकून घ्यायला हवं, मनमर्जी अतिरेक टाळलेलाच बरा.

ठळक मुद्देयोगाभ्यासापूर्वी सूर्यनमस्कारांचा अभ्यास केला तर तो निश्चितच फायदेशीर ठरतो.

वृषाली जोशी -ढोके

काही वर्षांपूर्वी करीना कपूरच्या "झीरो फिगर" चे खूप फॅड आले होते. तिने रोज भरपूर सूर्यनमस्कार घातले आणि दर दोन तासांनी काही ना काही खायचं असं  शेड्युल फॉलो केलं म्हणून तिला सहज झीरो फिगर करता आली असे तिच्या प्रसिध्द झालेल्या विविध मुलाखतींनी आपल्यापर्यंत पोहोचवले. मग ते ऐकून तशीच तब्येत करायची म्हणूनही अनेकजण रोज न चुकता सूर्यनमस्कार घालू लागले. काहींना फायदा झाला पण काहींना त्याचे दुष्परिणाम पण सोसावे लागले. सूर्यनमस्कार दिसायला सोप्पे आहेत पण फक्त जर शास्त्रोक्त पद्धतीने घातले गेले तरच. सूर्यनमस्कार भारतीय परंपरेतील एक प्राचीन व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्काराला सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार म्हणतात. या मध्ये सूर्यनारायणाची उपासना आहे म्हणजेच प्रत्येक नमस्कार घालताना सूर्यनारायणाचे नाव घेतले जाते. त्याचबरोबर यामध्ये आसनांची साखळी आहे, मंत्रशास्त्रातील बीज मंत्र ओम चे उच्चारण होते आणि ह्र काराची बाराखडी आहे. मंत्र सामर्थ्याबरोबरच सूर्यनमस्कार घालत असताना त्याला श्वसनाची जोड दिली गेली आहे. म्हणजेच श्वास घेणे सोडणे एवढेच अपेक्षित न ठेवता यामध्ये कुंभक (श्वास रोखणे) याचाही अभ्यास सांगितला आहे. सूर्यनमस्काराच्या अनेक विविध परंपरा आहेत. परंतु औंधचे महाराज कै. बाळासाहेब पंतप्रतिनधी यांनी रूढ केलेली "औंधकर पद्धती" अधिक योग्य आणि शास्त्रीय मानली जाते. शाळा, महाविद्यालये तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातून स्पर्धांकरिता हीच पद्धत अधिकृत मानली गेली आहे. या पद्धतीमध्ये एकूण दहा अंकांमध्ये सूर्यनमस्कार घातला जातो. सूर्यनमस्कार हे आबालवृद्ध, स्त्री, पुरुष अशा सर्वांकरिता अतिशय उपयुक्त आहे. सूर्यनमस्काराचे मूलभूत तंत्र शिकून घेतल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आवश्यकतेनुसार त्याचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार जलद गतीने घातले तर तो व्यायाम प्रकार होतो जो स्थूलता निवारणासाठी उपयुक्त ठरतो, आणि संथ गतीने म्हणजेच एका मिनिटाला एक या गतीने घातला तर तो योगाभ्यास होतो. या नमस्काराची आवर्तने करायची ठरवले तर दहा मिनिटात साधारण चौदा सूर्यनमस्कार घातले जाणे ही योग्य गती मानली गेली आहे. दैनंदिन व्यवहारात शरीराचे स्नायू ताठरलेले असतात अशा वेळी योगाभ्यासापूर्वी सूर्यनमस्कारांचा अभ्यास केला तर तो निश्चितच फायदेशीर ठरतो.

 रोज सूर्यनमस्कार केल्याने मिळणारे आणखी काही फायदे मिळतात..

१. शरीराची लवचिकता वाढते.२. हाडे मजबूत होतात.३. पचनशक्ती वाढते.४. ताण तणाव दूर होतो.५. शरीरातील रक्तसंचार सुधारतो.६. मुलांची उंची वाढण्यासाठी उपयुक्त.७. हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.८. वजन आटोक्यात ठेवण्यासाठीही उपयोग होतो.

(लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)

टॅग्स :योगआरोग्य