Lokmat Sakhi >Fitness > व्यायाम कधी करायचा? या अत्यंत अवघड प्रश्नाचं हे घ्या सोपं उत्तर !

व्यायाम कधी करायचा? या अत्यंत अवघड प्रश्नाचं हे घ्या सोपं उत्तर !

सकाळी वाटतं सायंकाळी करु, सायंकाळी वेळ नसतो मग वाटतं सकाळी करू, पण कितीही ठरवलं तरी व्यायामासाठी वेळ काढणंच अवघड होऊन बसतं! हे कोडं कसं सोडवायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 15:04 IST2021-03-15T14:54:26+5:302021-03-15T15:04:52+5:30

सकाळी वाटतं सायंकाळी करु, सायंकाळी वेळ नसतो मग वाटतं सकाळी करू, पण कितीही ठरवलं तरी व्यायामासाठी वेळ काढणंच अवघड होऊन बसतं! हे कोडं कसं सोडवायचं?

no time for exercise? try this way for consistent happy workout, exercise.. | व्यायाम कधी करायचा? या अत्यंत अवघड प्रश्नाचं हे घ्या सोपं उत्तर !

व्यायाम कधी करायचा? या अत्यंत अवघड प्रश्नाचं हे घ्या सोपं उत्तर !

Highlights व्यायाम करण्यातली सगळ्यातली कठीण गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे सातत्य!

गौरी पटवर्धन

व्यायाम कधी करायचा? किती अवघड प्रश्न हा. कुणीच असं म्हणत नाही की मी व्यायाम करणार नाही, पण वेळच नाही हे कारण मात्र पुढे येतं.
आणि नेमका प्रश्न विचारला जातो की व्यायाम कधी करायचा? कधी केला तर जास्त फायदेशीर असतो.
तर या अत्यंत अवघड प्रश्नाचं उत्तर मात्र अगदी सोपं आहे.
व्यायाम आपल्याला जमेल तेव्हा करायचा!
सकाळी - दुपारी - संध्याकाळी - रात्री… आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा व्यायाम करायचा, पण करायचा. मग त्यापुढचा प्रश्न येतो. आपण मारे चार दिवस सकाळी लवकर उठून चालायला जातो आणि पाचव्या दिवशी असं काहीतरी होतं, की आपण पहाटे चालायला जाऊच शकत नाही. पाहुणे येतात, धाकट्या ५ वर्षांच्या मुलाला ताप येतो, घरातल्या मदतनीस ताई येणार नाही असं जाहीर करतास.  काहीतरी होतं, आणि पाचव्या दिवशी आपण पहाटे उठून चालायला जाऊ शकत नाही. अशा वेळी काय करायचं? तर सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे रेटून आपल्या आपल्या वेळीच व्यायामाला जाण्याचा प्रयत्न करायचा. ही अचानक आलेली संकटं घरातल्या इतर सदस्यांवर ढकलून देता येतात का हे बघायचं. (ही आयडिया तर व्यायामाव्यतिरिक्त पण करून बघावी अशीच असते.) जर जमलं तर उत्तम. त्यामुळे काय होतं, तर आपला व्यायाम ही सिरियसली घेण्याची गोष्ट आहे हे घरातल्या इतर सदस्यांच्या लक्षात येतं. 


पण समजा तसं करणं शक्य नसेल तर?
म्हणजे वाढीव जबाबदारी इतर सदस्यांवर ढकलणं शक्य नसेल तर काय करायचं? व्यायाम बुडवायचा का? तर नाही. व्यायाम शक्यतो काहीही झालं तरी बुडवायचा नाही. त्या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ होईल तेव्हा आपण व्यायाम करायचा. सकाळी अकरा - दुपारी तीन - संध्याकाळी ७ - रात्री ९… कुठलीतरी वेळ अशी असते ज्यावेळी आपल्याला व्यायाम करणं शक्य असतं. त्यावेळी व्यायाम करायचा. नेहेमी आपण एक तास करत असू आणि अश्या दिवशी अर्धाच तास मिळाला तर अर्धाच तास करायचा, पण व्यायाम बुडवायचा नाही. कारण व्यायामाला दांड्या मारण्याची सवय फार म्हणजे फारच पटकन लागते. त्या मोहात अडकायचं नाही.
शक्यतो अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून मुळात व्यायामाची वेळ ठरवतांना त्यातल्या त्यात आपल्या सोयीने ठरवायची. ती वेळ कुठलीही असली तरी चालते. फक्त काही खाल्ल्यावर किंवा जेवल्यावर लगेच व्यायाम करू नये, नाहीतर पोटात दुखू शकतं. एकदा ही पायरी आपण ओलांडली की आपल्याला आपल्या शरीराचा नैसर्गिक ताल लक्षात येऊ लागतो. शक्यतो त्याच्या विरोधात जाऊन टाईमटेबल लावण्याचा प्रयत्न करू नये.
नैसर्गिक ताल म्हणजे काय? तर आपल्याला कुठल्या वेळी व्यायाम केल्यावर छान वाटतं हे बघणं. काही माणसं जशी निसर्गतःच सकाळी लवकर उठू शकतात, काही रात्री उशिरापर्यंत जागू शकतात, काहींना अजिबात भूक सहन होत नाही, तर काही मात्र तासचेतास न खाता राहू शकतात. तसंच, काही जणांना सकाळी व्यायाम करायला नैसर्गिकरित्या आवडतं, तर काहींना संध्याकाळी व्यायाम करायला मजा येते. आपण त्यातल्या कुठल्या प्रकारात मोडतो हे आपल्याला लक्षात येतं. त्या आपल्या नैसर्गिक आवडीच्या, तालाच्या जवळ जाणारी वेळ व्यायामासाठी राखीव ठेवावी.
ते जर का आपण केलं नाही, तर आपलाच व्यायाम टाळण्याकडे कल वाढायला लागतो. आणि व्यायाम करण्यातली सगळ्यातली कठीण गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे सातत्य! ते टिकवायचं तर हेच लक्षात ठेवायचं की, व्यायाम कधीही करावा. पण बुडवू नये!

Web Title: no time for exercise? try this way for consistent happy workout, exercise..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.