Join us  

‘विस्मरणा’चा त्रास? रोज फक्त ४० मिनिटं चाला!- ‘चालाल’ तर विसरभोळेपणा टाळाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 3:35 PM

आठवड्यातून केवळ तीन दिवस ४० मिनिटे चाललं तरी विस्मरणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते!- हा नुसता सल्ला नव्हे! अमेरिकेतील कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या ताज्या संशोधनाचा निष्कर्ष आहे हा! आणि त्यामागे आहे, वर्षभराची मेहनत!

ठळक मुद्देकोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेला हा अभ्यास न्यूरोइमेज या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

नित्यनेमानं व्यायाम करणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. काही आजार झाल्यावर किंवा डॉक्टरांनी सक्तीचा व्यायाम सांगितल्यानंतर अनेक जणांचे डोळे उघडतात. मग ते व्यायामाला सुरुवात करतात. पण, तेही कायम टिकेल असं नाही. आजारातून थोडं बरं वाटायला लागलं की पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन’ सुरू होतात. तुम्ही जॉगिंग ट्रॅकवर धावायला जाऊ शकता किंवा चालू शकता, असंही डॉक्टरांकडून बऱ्याचदा सांगितलं जातं. आपल्याकडे आयुर्वेदात तर चालण्याचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणात सांगितलं आहे. पण, नुकत्याच झालेल्या संशोधनात चालण्याचे आणखी काही महत्त्वाचे फायदे समोर आले आहेत.

(छायाचित्र: गुगल)

वय वाढत जातं तसं अनेकांना विस्मरणाची समस्या उद‌्भवते. अनेक गोष्टी विसरल्या जातात. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम होतो. हा आजारही तसा चिवट आणि किचकट. त्यासाठी पैसा तर भरपूर लागतोच, दीर्घकाळ उपचारही करावे लागतात. तरीही विस्मरणाची ही समस्या शंभर टक्के सुटेलच असं नाही. अशा लोकांचं जीवन बऱ्याचदा दुसऱ्या लोकांवर अवलंबून राहतं.कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत सखोल अभ्यास केला. त्यासाठी अनेक लोकांवर त्यांनी चाचणी घेतली. या संशोधनात त्यांना आढळून आलं की आठवड्यातून केवळ तीन दिवस ४० मिनिटे चाललं तरी विस्मरणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. त्यासाठी तरुण, मध्यमवर्गाबरोबरच मुख्यत्वे साठ ते ऐंशी या वयोगटातील लोकांवर दीर्घ काळ चाचणी घेतली. त्या अभ्यासाचे निष्कर्ष पुन्हा पुन्हा तपासून पाहिले. त्यांच्या लक्षात आलं की ‘मेमरी लॉस’ या समस्येवर चालणं हा अतिशय उत्तम उपाय आहे. अनेकांना वाटतं, की व्यायामशाळेत जाऊन व्यायाम केला, कठोर मेहनत घेतली तरच त्याचा उपयोग होतो, असं नाही. वृद्धांच्या बाबतीत आणि मुख्यत: जे तीव्र स्वरूपाचा व्यायाम करू शकत नाहीत, त्यांनी केवळ चालण्याचा व्यायाम केला तरी त्यांच्या स्मरणशक्तीत चांगली सुधारणा होऊ शकते. इतर ‘मेहनती’ व्यायामाचाही उपयोग होतोच, पण त्यापेक्षाही चालण्याचा व्यायाम जास्त उपयोगी ठरतो, असं संशोधकांचं निरीक्षण आहे. चालण्यामुळे मेंदू तरतरीत होतो. मेंदूतील पेशी उत्तेजित होतात, मेंदूतील पांढऱ्या पेशींची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे विस्मरणाचा आजारही कमी होतो, हे त्यांनी प्रयोगानिशी सिद्ध केलं.यासाठी संशोधकांनी तीन गट केले होते. त्यात वेगवेगळ्या वयोगटाचे लोक होते. पहिल्या गटाला वेट लिफ्टिंग, स्ट्रेचिंग, बॅलन्स ट्रेनिंग दिलं गेलं. दुसऱ्या गटाला नृत्य आणि समूहनृत्य करायला सांगण्यात आलं तर तिसऱ्या गटाला जलद चालण्याचा व्यायाम दिला गेला. तब्बल सहा महिने ते वर्षभर या लोकांचं बारकाईनं निरीक्षण करण्यात आलं आणि त्याचा तौलनिक अभ्यासही करण्यात आला. तिन्ही प्रकारच्या लोकांना आपापल्या व्यायामाचा फायदा झाला, पण स्मरणशक्तीसाठी सर्वांत जास्त फायदा चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांना झाला. त्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या ‘मेमरी टेस्ट’ घेण्यात आल्या. त्यात चालणारा गट अव्वल गट ठरला.कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेला हा अभ्यास न्यूरोइमेज या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.या अभ्यासानुसार ज्यांना नृत्याचा व्यायाम दिला होता, त्यांचा परफॉर्मन्स स्मरणशक्तीच्या बाबतीत सर्वांत कमी आढळून आला. अर्थात हा व्यायाम वाईट किंवा कमी प्रतीचा नाही, प्रत्येक संतुलित व्यायामाचे काही ना काही फायदे होतातच, हेदेखील संशोधकांनी स्पष्ट केलं. लोकांना चालण्याचा व्यायाम लगेच सुरू करता आला, पण ज्यांना नृत्याचा व्यायाम दिला होता, त्यांचा व्यवस्थित अंतर ठेवून रांग लावण्यात, नृत्याच्या स्टेप्स समजून घेण्यात बराच वेळ गेला, ज्या वयस्कर लोकांनी जास्त शारीरिक कष्टाचा व्यायाम केला, त्यांच्या मेंदूतील पेशी मात्र आक्रसल्या, त्यांचा परफॉर्मन्स इतरांपेक्षा घसरला, असंही संशोधकांचं निरीक्षण आहे. व्यायामामुळे सगळ्यांच्याच आकलनशक्तीत काही ना काही प्रमाणात वाढ झाली. मात्र कुठलाही व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, असंही संशोधकांनी बजावलं आहे.अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत बऱ्याच संशोधकांना वाटत होतं, की एकदा मूल जन्माला आलं की त्याच्या मेंदूच्या रचनेत मरेपर्यंत बदल होत नाही. मेंदूत फक्त लहानपणीच नव्या पेशी तयार होतात, त्यानंतर नव्या पेशी निर्माण होणं कायमचं थांबतं आणि त्यानंतर त्यांच्यात केवळ ऱ्हासच होतो, असंही संशोधकांमध्ये मानलं जातं. नव्या संशोधनामुळे यासंदर्भाच्या पुढील संशोधनाला गती मिळाली आहे.तरुणांवरही संशोधन करणार... लवकरच आम्ही पुढच्या संशोधनाला सुरुवात करू, असं या संशोधनाच्या सहलेखिका आणि न्यूरोसायन्सच्या प्राध्यापिका डॉ. अग्नेस्का बर्झिन्स्का यांचं म्हणणं आहे.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्य