Join us  

चाळीशी उलटली तरी करिना कपूर दिसते 'स्टनिंग'; तिच्यासारखं रूप हवं तर 'या' गोष्टींकडे लक्ष द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:05 PM

चाळिशीतली करिना कपूर आणि चाळीशीतल्या आपण, असं चित्र डोळ्यासमोर आणलं तरी दचकायला हाेतं ना? कारण आपल्यापेक्षा ती खूप लहान वाटू लागते. असं का होतं?

ठळक मुद्देआपण सडपातळ आहोत, मग आपल्याला व्यायामाची काय गरज, असा बहुतांश महिलांचा स्वत:विषयी एक गैरसमज असतो.

काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या शरीरयष्टीवरून किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून त्यांच्या वयाचा अंदाज अजिबातच बांधता येत नाही. विशेषत: महिलांच्या बाबतीत तर असे अंदाज हमखास चुकतात. काही जणी आहे त्या वयापेक्षा खूप जास्त दिसतात, तर काही जणी वय जास्त असूनही अगदीच तरूण वाटतात. आता बॉलीवूड अभिनेत्री बेबो म्हणजेच करिना कपूरचंच पहा ना. करिना सध्या तिचा चक्क ४१ वा वाढिदवस साजरा करत आहे. चाळिशीनंतर तिचे सौंदर्य अजिबातच कमी झालेले नाही. त्यात अवघ्या काही महिन्यांपुर्वी तिने बाळालाही जन्म दिला. असे असतानाही ती फिट ॲण्ड फाईन तर दिसतेच आहे, पण दिवसेंदिवस तिचा लूक अधिकच स्टनिंग होत आहे. असं काय करते करिना जे आपल्याला नाही जमत?

 

सामान्यपणे कोणत्याही अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा जेव्हा केली जाते, तेव्हा महिला तिच्या दिसण्याची, तिच्या फिटनेसची अगदी तोंडभरून स्तूती करतात. पण या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक पालूपद मात्र हमखास ठरलेले असते. ते म्हणजे... 'ती काय बाई अभिनेत्री आहे, तिला ना कशाची कमी आहे, ना आपल्यासारखी चिंता... मग काय झालं तिला सुंदर न दिसायला...'. ही अशी वाक्य आपण ऐकलेली तरी असतात किंवा आपणच ती म्हटलेलाे तरी असतो. पण खरोखरच हे त्यांच्या सौंदर्याचं किंवा त्यांच्या फिटनेसचं कारण नसतं. वय झालं तरी अभिनेत्री फिट असतात आणि सुंदर दिसतात कारण त्याच्यासाठी त्यांनी खरोखरंच खूप मेहनत घेतलेली असते. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींवर त्यांनी खूप लक्ष दिलेलं असतं.

 

इथेच नेमके आपण कमी पडतो आणि चाळीशी जवळ येऊ लागताच प्रौढ दिसू लागतो. अगदी करिना कपूर सारखंच नाही, पण तरीही थोडीफार काळजी आपणही आपल्या आहाराची करू शकतो. स्वत:चा फिटनेस टिकवण्यासाठी थोडा वेळ स्वत:ला देऊ शकतो. चुकीच्या आहाराच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढतात. याचा सगळ्यात लवकर परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळेच चाळीशीनंतरही आपले सौंदर्य आणि फिटनेस सांभाळायचा असेल, तर आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींकडे महिलांनी लक्ष देणे अगदीच गरजेचे आहे. 

 

चाळीशीनंतर होतात शरीरात बदलचाळीशी येईपर्यंत शरीराची चयापचयाची गती मंद झालेली असते. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साठायला सुरुवात होते आणि शरीर बेढब दिसू लागते. चाळीशीच्या आसपास अनेक महिलांना मेनोपॉजचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे हार्मोन्सचे संतूलन बिघडत जाते. त्याचाही परिणाम शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसू लागतो. चिडचिडेपणा, मानसिक अस्वस्थाता, ताण वाढत जातो आणि यातून अनेक आजार उद्भवतात. त्यामुळेच चाळीशीनंतर आपल्या आहार- विहारात काही बदल करणे गरजेचे आहे. 

 

चाळीशीनंतर अशी घ्या काळजी- रोजच्या जेवणात तृणधान्ये, कडधान्ये, डाळी तसेच हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, दूध व दुधाचे पदार्थ असतील, अशी काळजी घ्यावी. असा परिपूर्ण आहार असेल तर त्यातून शरीराला प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, कॅलरीज, जीवनसत्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ योग्य प्रमाणात मिळतात.

- चाळीशीनंतर शरीरातील कॅल्शियम कमी होत जाते. हाडे ठिसूळ होत जातात. त्यामुळे दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन तर वाढवावेच पण त्यासोबतच हिरव्या भाज्या, नाचणी, सुकामेवा, अंडी, खसखस, तीळ, राजमा, राजगिरा, पुदिना, कडीपत्ता, बदाम, सोयाबीन, गाजर, शेवगा यांचे सेवन वाढवावे. - चाळीशीनंतर शरीराला फॉलिक ॲसिडची देखील गरज असते. त्यामुळेच फळे, डाळी, खजूर, गुळ-शेंगदाणे, फुलकोबी, मुळ्याची पाने, शेपू, अळीव, बीट, गाजर, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, सुकामेवा जरूर खावा.

 

स्वत:साठी थोडा वेळ काढाआपण सडपातळ आहोत, मग आपल्याला व्यायामाची काय गरज, असा बहुतांश महिलांचा स्वत:विषयी एक गैरसमज असतो. पण तुम्ही व्यायाम न करता फार काळ सडपातळ राहू शकत नाही, हे वास्तव लगेचच स्विकारा. व्यायाम न करता जरी तुम्हाला सडपातळ राहणे जमलेच तरी तुमची फिटनेस लेव्हल अतिशय कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत:चा फिटनेस वाढविण्यासाठी काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा. अगदी अर्धा तास देखील पुरेसा आहे. यावेळेत सुर्यनमस्कार, वॉकींग किंवा तुम्हाला जो व्यायाम करायला आवडत असेल, तो व्यायाम करा. अशा प्रकारे आहार आणि व्यायाम केला तर करिनाप्रमाणेच तुम्हीही चाळीशीनंतर छानच दिसाल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सकरिना कपूरमहिलाहेल्थ टिप्स