Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > कुणी सरी घातली तर आपण दोरीनं गळफास घेणार का? डाएट-फिट-पॉझिटिव्हिटीच्या स्ट्रेसचा डोक्याला ताप

कुणी सरी घातली तर आपण दोरीनं गळफास घेणार का? डाएट-फिट-पॉझिटिव्हिटीच्या स्ट्रेसचा डोक्याला ताप

New Year 2026 : जानेवारीतले संकल्प तुटले, नेहमीसारखे सगळेच कोलमडले तर काय बिघडलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 16:29 IST2026-01-22T16:28:23+5:302026-01-22T16:29:54+5:30

New Year 2026 : जानेवारीतले संकल्प तुटले, नेहमीसारखे सगळेच कोलमडले तर काय बिघडलं?

fitness tips, fitness resolution for new year, diet fitness plan for new year  | कुणी सरी घातली तर आपण दोरीनं गळफास घेणार का? डाएट-फिट-पॉझिटिव्हिटीच्या स्ट्रेसचा डोक्याला ताप

कुणी सरी घातली तर आपण दोरीनं गळफास घेणार का? डाएट-फिट-पॉझिटिव्हिटीच्या स्ट्रेसचा डोक्याला ताप

Highlightsव्यायामाची सवय नसेल तर ती अचानक सुरू होणारी नी टिकणारी गोष्ट नाही. ती हळूहळू जमेल.

नेहा बडगुजर (समुपदेशक)

जानेवारी महिना निम्मा उलटला. नवीन वर्ष आलं की हमखास व्यायामाचे, फिटनेसचे संकल्प होतात. यावर्षी आपली तब्येत ठणठणीत करायची असं अनेकजण ठरवतात. जिम लावलं जातं, मॉर्निंग वॉक सुरू केले जातात. योगा क्लासेस सुरू होतात आणि मग २०/२५ जानेवारी उजाडता उजाडता अनेक गोष्टी बंद होऊ लागतात. किंवा हे सारं आपल्याला करायचं याचाच इतका स्ट्रेस येतो. डाएटचे नियम पाळताना धाप लागते. रोजच्या जगण्यात कुठून आपण ही कटकट वाढवून बसलो असं वाटून मरो हे सगळं असं म्हणून सोडून देणं सुरू होतं.
त्यात आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपल्याला काही ना काही माहिती देतात. कुणी एक दोरी घेऊन व्यायाम करतं तर कुणी एक खुर्ची घेऊन व्यायाम करतं, कुणी योगासनं, कुणी अमुक पाणी, तमुक स्मूदी घेऊन फिट होतं. कुणी मॅनिफॅस्टेशन शिकतं तर कुणी अफरमेशन करा म्हणतं. कुणाचे व्हिजन बोर्डच इतके सुंदर की आपण आयुष्यात काहीच केलं नाही असं ते पाहून वाटू लागतं. कुणी म्हणतं रोज सातच्या आत जेवा आणि तेव्हा आपण ऑफिसात असतो, रात्री दहाशिवाय आपल्या पोटात अन्न जात नाही.


थोडक्यात, जानेवारीत असे लाइफस्टाइल ताण फार वाढतात. मोटिव्हेशन मारा इतका असतो की आपण काहीच कसं करत नाही हे वाटून न्यूनगंडही वाढतो.
मन कुरतडू लागतं. वाटतं बाकीचं जग एकदम भारी जगतं आहे आणि आपण आपल्या आयुष्यात काहीच करत नाही. आपणच कसे काय कायमच पिचलेले, मन मारून जगणारे, पेचात अडकलेले, नोकरीच्या दावणीला बांधलेले, इएमआयच्या चक्रात अडकून नाकासमोर जगणारे, एकेक सुटीसाठी बॉससमोर हात पसरणारे, वेळच नाही म्हणून अनेक गोष्टींची विशलिस्ट वाढतच ठेवणारे, असे कसे आपण!
आणि मग आपण हेच सारं मनाशी घेऊन कुढत बसतो. लोकांचे महागडे मेकओव्हर फोटो सोशल मीडियात पाहतो, त्यांचे बिफोर आफ्टर फोटो वेगळे दिसतात. आपण तसेच दिसतो, तसेच जगतो असं वाटून स्वत:विषयीच्या आदराला सुरुंग लावतो.


यासाऱ्यानं बदलत काहीच नाही. पण आपली स्वप्रतिमा मात्र खराब होत जाते. आपण आपल्या शरीराचा, दिसण्याचा स्वीकार करणं, आपली तब्येत धडधाकट आहे याचा आनंद मानून घेणंही बंद करतो. आपल्याला आता न होणारे कपडे आवडतात, आताचे कपडे अगदीच वाईट दिसतात असं वाटतं. हे तर आपल्यालाही माहितीच असतं की सोशल मीडियात दाखवलं जातं तितकं सुखी आयुष्य कुणाचंच नसतं. जो तो झगडतच असतो कुठल्या ना कुठल्या प्रश्नांशी..
पण आपण आपल्या जगण्यातलं चांगलं पाहणंच विसरू लागतो..
म्हणून एक गोष्ट करायला हवी. १ जानेवारीचा मुहूर्त हुकला तर १ फेब्रुवारीपासून करू, जमेल तेवढं करू.. पण मनापासून करू.. त्यानं आपल्याला आनंद वाटला पाहिजे हीच मुख्य अट. पाहूया त्या आनंदासाठी काय करता येईल..

 

आपल्याला काय करता येईल?

१. आपली लाइफस्टाइल नेमकी कशी आहे हे आधी पाहू. आपली नोकरी, सकाळी उठण्याची वेळ, घरातली कामं, प्रवासातला वेळ, परतीचा वेळ, पुन्हा आल्यावर जेवण याच्या वेळांचा अंदाज घेऊ. त्यात काही बदलता येतं का, बदलणं आवश्यक आहे का, शक्य आहे का हे पाहू. सूर्यास्तापूर्वी ना सही, नेहमीपेक्षा एक तास लवकर जेवण एवढं करता आलं तर तेवढं करू...
२. अतिव्यायामाला वेळ देणं शक्य नाही. आपण रोज फक्त १५ मिनिटं आपल्याला आवडणारा व्यायाम करू शकू का? जे आवडेल ते, कधी नाही जमलं तर तो दिवस माफ.
३. मोबाइलवर अकारण वेळ किती वाया जातो, हे जरा खरं खरं स्वत:शी बोलू. तो वेळ आठवड्याला फक्त ३० मिनिटांनी कमी करता येईल का? तपासून पाहू, कमी करायचा प्रयत्न तर करू...
४. आपण आपलं हेल्थ प्रोफाइल तयार करू. वजन उंची शुगर दुखणीखुपणी हिमोग्लोबीन बी १२ असे नेहमीचे त्रास लिहून काढू. आणि त्यावर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानं उपाययोजना करू. वर्षाच्या शेवटी आपलं आपल्याला समजेल की आपल्यात इतकी सुधारणा झाली. आनंद वाटेल त्याचा..
५. आठवड्यातून एकदा तरी मुलांसोबत मैदानी खेळ खेळायला जाता येईल का, घरबसल्या काही खेळ खेळता येतील का? मुलांनाही मस्त वाटेल आपलाही ताण हलका होईल. टीव्हीसमोर न बसता कॅरम खेळणं ते ओरिगामी शिकणं ते पत्ते खेळणं ते बॉल बाॅल खेळणं काय जमेल ते करू. म्हणजे घरातला ताणही जरा निवळतो.


६. व्यायामाची सवय नसेल तर ती अचानक सुरू होणारी नी टिकणारी गोष्ट नाही. ती हळूहळू जमेल. रोज अर्धा तास चालायला गेलो तर कधीतरी पळावंसं वाटेल किंवा सायकल चालवावीशी वाटेल. रोज सूर्यनमस्कार घातले तर योगासनांच्या क्लासची गोडी लागेल. गोष्टी सहज शिकायच्या तर विषयाची गोडी लागली पाहिजे हे सूत्र इथंही लक्षात ठेवलेलं बरं.
७. तेच डाएटचंही. सोपं करू. तासभर लवकर जेवणं. ब्रेड बिस्किटांसह पॅकेज्ड फूड बंद, बाहेरचं जेवण बंद, गोड खाणं कमी असे छोटे बदल करू. मग मोठे शिस्तबद्ध डाएट करण्याचा विचार करू.
८. छोटे छोटे बदल आपल्याला सेंस ऑफ अचिव्हमेंट अर्थात काम पूर्ण केल्याचा आनंद देतात. मग आपला हुरूप वाढतो आणि आपोआप मोठे बदल होतात. छोट्या बदलातलं सातत्य ही खऱ्या मेकओव्हरची गुरुकिल्ली आहे.

 

Web Title : आहार के तनाव को हावी न होने दें; प्राप्य जीवनशैली बदलावों को अपनाएं।

Web Summary : नए साल के संकल्प अक्सर तनाव का कारण बनते हैं। कठोर उपायों के बजाय, जल्दी भोजन, 15 मिनट के व्यायाम और स्क्रीन टाइम कम करने जैसे टिकाऊ जीवनशैली बदलावों पर ध्यान दें। छोटे, लगातार बदलाव और आत्म-स्वीकृति कल्याण की कुंजी हैं।

Web Title : Don't let diet stress you; embrace achievable lifestyle changes.

Web Summary : New year resolutions often lead to stress. Instead of drastic measures, focus on sustainable lifestyle changes like early dinners, 15-minute exercises, and reducing screen time. Small consistent changes and self-acceptance are key to well-being.