Join us  

नवरात्रात उपवास करताय, करा 'हे' प्राणायाम; मनःशांतीसह तब्येतही राहील उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 5:04 PM

नवरात्री म्हटले की नऊ दिवसांचे उपवास आणि त्यामुळे येणारा थकवा किंवा पित्त...पण यापासून दूर राहायचे असेल तर काही सोपे प्राणायाम प्रकार केल्यास शरीरातील थंडावा टिकवण्यास मदत होऊ शकते.

ठळक मुद्देसध्याचे वातावरणही सतत बदलत असल्याने शरीरातील आम्ल खवळू शकतेउपवासामुळे पित्त खवळण्याची शक्यता असते. प्राणायामाचे काही प्रकार केल्यास शरीर थंड राहण्यास फायदा होऊ शकतो.

नवरात्र काळात उपवासाच्या पदार्थांमध्ये अधिक तर पदार्थ पित्त वाढविणारेच असतात. तसेच काही न खाता पिता उपवास करायचा म्हटले तरी उपाशी राहिल्याने देखील पित्त वाढते. सध्याचे वातावरणही सतत बदलत असल्याने शरीरातील आम्ल खवळू शकते. हा त्रास उद्भवू नये आणि आपले सणाचे दिवस आनंदात, उत्साहात जावेत यासाठी प्राणायाम उपयुक्त ठरतो. प्राणायाम करण्याचे बरेच प्रकार असून शीतली आणि सित्कारी तसेच चंद्रभेदन हे प्राणायाम केले तरी पोटातील उष्णता कमी होण्यासाठी उपयोग होईल. पाहूयात या प्राणायामाच्या प्रकारांविषयी...

शीतली प्राणायाम -

पद्मासन, वज्रासन किंवा सिद्धासन यापैकी कोणत्याही एका ध्यानात्मक असनात बसावे.

विधी- दोन्ही हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रा करून ठेवावेत किंवा गुडघ्यावर पालथे ठेवावेत. आता तोंडातून जीभ बाहेर काढून नळीसारखी गोल करा. आता जिभेच्या नळीतून श्वास (पूरक) जमेल तेवढा आत घ्या. फुप्फुसांमध्ये जास्तीत जास्त हवा भरली जाऊ दे. जीभ आत घेऊन तोंड बंद करा. काही क्षण कुंभक करून श्वास आत धरून ठेवा. नंतर नाकाने संपूर्ण हवा उश्वासावाटे (रेचक) बाहेर सोडा.

फायदे - हा प्राणायाम करताना जीभेतून हवा आत घेतो तेव्हा ती थंड होऊन जाते यामुळे उष्णतेवर, पित्तावर नियंत्रण येते.  या आसनामुळे तहान व भुकेवर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे उपवासाच्या कालावधीत जास्त भूक लागू नये म्हणून या प्राणायामाचा सराव उपयुक्त ठरू शकतो.

( Image : Google)

सित्कारी प्राणायाम-

इतर प्राणायामाप्रमाणेच हा प्राणायामही ध्यानात्मक आहे. हे प्राणायम बसून करावे.

विधी- या प्राणायामात वरचे व खालचे दात एकमेकांवर दाबून धरावे दोन्ही ओठ विलग करून ठेवावेत म्हणजे दोन्ही दातांची लाईन आपल्याला आरशात व्यवस्थित दिसू शकेल आता दातांच्या फटीमध्ये धून हवा आत खेचून घेऊन फुफ्फुसे पूर्ण हवेने भरून घ्या. अशाप्रकारे हवा आत घेताना सीsss या प्रकारचा आवाज होईल. तोंड बंद करा. काही काळ कुंभक करावे म्हणजे हवा आत कोंडून धरावी. आता नाकाने सावकाश हवा बाहेर सोडून द्यावी. असे आठ ते दहा वेळा करावे. 

काळजी - कफविकार, टॉन्सिल्स असणाऱ्यांनी शीतली व सित्कारी प्राणायाम करू नये.

( Image : Google)

चंद्रभेदन प्राणायाम

विधी - हा प्राणायाम करताना उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी डाव्या नाकपुडीने जमेल तेवढा श्वास आत घ्यावा (पूरक). नंतर डावी नाकपुडी बंद करून जमेल तेवढा श्वास आत रोखून धरावा (कुम्भक करावे). नंतर उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून श्वास हलकेच सोडून द्यावा(रेचक).

फायदे - या प्राणायामामुळे शरीरात शीतलता निर्माण होऊन थकवा आणि उष्णता दूर होण्यास मदत होते उपवासाच्या दृष्टीने विचार केल्यास पित्त वाढल्यामुळे जळजळ होत असेल तर ती कमी व्हायला मदत होईल. सुरुवातीपासूनच थोडा थोडा या प्राणायामाचा सराव केला तर पित्तामुळे होणारे त्रास टाळून उपवासाचा कालावधी सहज पार करू शकाल.

नीता ढमढेरे योगतज्ज्ञneetadhamdhere@gmail.com

टॅग्स :फिटनेस टिप्सनवरात्री