lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > फुकट ते पौष्टिक म्हणत ऑनलाइन पाहून, मनानेच वाट्टेल तेव्हा योगासनं करताय ?

फुकट ते पौष्टिक म्हणत ऑनलाइन पाहून, मनानेच वाट्टेल तेव्हा योगासनं करताय ?

आपल्याला वेळ मिळेल तेव्हा, ऑनलाइन फुकट व्हीडीओ आहेत म्हणून तज्ज्ञांचा सल्ला न घेता योगासनं करणं फायद्याचं नाही ठरत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 03:49 PM2021-05-19T15:49:23+5:302021-05-19T15:58:35+5:30

आपल्याला वेळ मिळेल तेव्हा, ऑनलाइन फुकट व्हीडीओ आहेत म्हणून तज्ज्ञांचा सल्ला न घेता योगासनं करणं फायद्याचं नाही ठरत..

doing yoga without expert guidance, its risky | फुकट ते पौष्टिक म्हणत ऑनलाइन पाहून, मनानेच वाट्टेल तेव्हा योगासनं करताय ?

फुकट ते पौष्टिक म्हणत ऑनलाइन पाहून, मनानेच वाट्टेल तेव्हा योगासनं करताय ?

वृषाली जोशी-ढोके

प्रोजे्ट्स, टार्गेट, रिव्ह्यूज हे शब्द आता शाळकरी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच रोजच्या जीवनाचा  महत्त्वाचा भाग झालेत. एक प्रकारचे मायाजालच. एक प्रोजेक्ट आलं की त्यानुसार टार्गेट ठरतात, मग रिव्ह्यूज सुरू होतात आणि मग त्यानुसार ठरतो तो हातात पडणारा पगार, पैसा किंवा ग्रेड. एक प्रोजेक्ट झाले की दुसरे, की तिसरे की पुढचे असे सुरुच राहते. या चक्रात फक्त ते काम करणारी  व्यक्तीच नाही तर तिचे पूर्ण कुटुंब अडकत जाते.  कारण सकाळी लवकर घराबाहेर पडायचे म्हणून नाश्ता, डब्यासाठी स्वैपाक, घरी यायला उशीर होईल म्हणून मध्ये काहीतरी च्यावम्याव, त्यासाठीची तयारी आणि ते सुध्दा सगळं वेळेत. सगळेच  कशामागे तरी फक्त धावत आहेत आणि स्वतःला तणावग्रस्त करून घेत आहेत. जीवनशैली एकीकहे तणावग्रस्त तर दुसरीकडे स्वतः कडून असो किंवा दुसऱ्याकडून अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण झाल्या नाहीत की नैराश्य, ताण, चिडचिड हे सगळं अनुभवायला मिळते. या ताणातून नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मग पार्टी करणे, वीकेंड ट्रीपला जाणे, गेट टुगेदर अश्या अनेक गोष्टी सुरू होतात. पण तरीही ताणतणाव, चिडचिड, कशाची तरी भीती वाटत राहणे, असुरक्षितता हे सारे घेरतेच. त्याावर उपाय म्हणून आता सगळे सांगतात की योगाभ्यास करा, मेडिटेशन करा. कळतं सगळ्यांना पण वळत नाही चटकन.
त्यासाठी मग कारणं सांगितली जातात, सकाळी वेळ? मिळत नाही तर संध्याकाळी केलेला नाही चालणार का? अभ्यास रोजच करायचा का? खरंतर कुठंही बाहेर न जाता, स्वत:च्या घरातच, स्वतः साठी अर्धा ते एक तास  मनःशांतीसाठी आणि आरोग्यासाठी वेळ काढायचा आहे.


पण वेळ.. 
हा पण आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्या पण बरोबर मनात येणारे प्रश्न, शंका आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात. त्यात हल्ली ऑनलाइन फुकट व्हीडीओ पाहूनही योगासने काहीजण करतात. एक दहा बारा आसनं जमु लागले की आपण योग तज्ज्ञ झालो असे समजणारी बरीच मंडळी आहेत. "फुकट ते पौष्टिक" या नादात मग काहीजणी आपल्याला जमेल त्यावेळी काही गोष्टी शिकायला जातात. पण त्यामागचं शास्त्र समजून घेतलं नाही तर मग काहीतरी चुकीचं करुन मग त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. आणि मग पुन्हा काहीजण म्हणतात की, आम्ही खूप केलं पण त्याचा उपयोग होत नाही.

योगअभ्यास सुरु करताना आपण काही गोष्टी नीट पाहून तपासून घ्यायला हव्यात.

१. योग्य योग मार्गदर्शक निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे. जी व्यक्ती आपल्याला शिकवणार ती योगअभ्यास कुठून शिकली आहे? त्यांचा स्वतःचा अभ्यास कसा आहे? 
२. उत्तम प्रशिक्षकाकडून शिकण्यासाठी थोडे पैसा खर्च करायची वेळ आली तरी आपली तयारी हवी. गंमत पहा, एक पिझ्झा साधारण ५०० ते १००० रुपयांना येतो तो आपण ५ मिनिटात क्षणिक आनंद घेऊन संपवतो आणि खुश होतो पण व्यायामासाठी किंवा योग शिकण्यासाठी फी भरताना आपण दहा वेळा विचार करतो "फार फी आहे, बुवा" एवढा खर्च परवडत नाही. 
३. योग हा क्षणिक आनंद नाही तर चिरकाल टिकणारा आनंद शिकवून जातो आणि खर्चापेक्षा आपल्या तब्येतीची इन्व्हेस्टमेण्ट देऊन जातो. तर आपल्या बरेचदा कोणी तरी काहीतरी करतंय म्हणून आपणही करू या नादात आपण आपल्या स्वतःची क्षमता न ओळखता गोष्टी करायला जातो . कोणत्या अभिनेत्रीने १०० सूर्यनमस्कार घातले आणि फिगर मेन्टेन केली म्हणून आपणही तसे एकाएकी करायला गेलो तर फिगर मेन्टेन नाही मोडून जाईल. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत आणि प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. 
४. योगशास्त्र भारतीय संस्कृतीची देण आहे. परंतु आपण वेळीच त्याची किंमत केली नाही, परदेशी लोक  योगशास्त्र घेऊन गेले आणि त्यात फॅशन म्हणून आणि बदल करून पॉवर योगा, स्मार्ट योगा असे काही प्रकार घेऊन आले. परंतु योग किंवा आसन ही कवायत नसून एक स्थिर बैठक, साधना आहे.  नुसती योगासनं नाहीत तर त्याचबरोबर श्वसन अभ्यास, प्राणायाम, ओमकारसाधना, त्या अनुषंगाने येणारा आहार या सगळ्याच गोष्टींचा विचार होतो. त्यामुळे उत्तम फिटनेस, मन:शांतीसाठी योगअभ्यास जरुर करा, मात्र सुरुवात करताना सजग राहून आरंभ करा..

( लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)

Web Title: doing yoga without expert guidance, its risky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग