Join us  

फक्त एरोबिक्स करुन वजन कमी होतं का? मुख्य म्हणजे फिटनेस वाढतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 3:31 PM

लाेअर बॉडी व्यायाम केले, पण अप्पर बॉडीचं काय, त्यासाठी अजून काय करायला हवं?

ठळक मुद्देरोबिक व्यायाम संपल्याच्या नंतर वेगळ्याने अपर बॉडी एक्सारसाईझ करायचा, पण करायचाच!

गौरी पटवर्धन

वजन कमी करण्यासाठी, बारीक होण्यासाठी, फिटनेससाठी वगैरे मुख्यतः एरोबिक स्वरूपाचा व्यायाम करावाच लागतो हे आपण बघितलं. प्रत्येकीच्या शरीराची ठेवण, तब्येत, गरज, आजूबाजूचा परिसर, उपलब्ध साधनं या सगळ्यांचा विचार करून प्रत्येकीला तिच्यासाठी योग्य असा एरोबिक व्यायाम ठरवावा लागतो. त्यात चालणं, धावणं, पोहोणं, जिना चढणं, सायकल चालवणं अशा अनेक व्यायाम प्रकारांचा समावेश असू शकतो. एका वेळी एकाच प्रकारचा व्यायाम केला पाहिजे असंही नसतं. दोन किंवा तीन प्रकारचे व्यायाम आलटून पालटून केल्यानेही बरेच फायदे होतात. पहिलं म्हणजे त्याचा कंटाळा येत नाही. दुसरं म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू वापरले गेल्यामुळे त्या सर्व स्नायूंना आलटून पालटून व्यायाम होतो. पण तरीही नुसता एरोबिक व्यायाम करून भागत नाही. असं का?त्यामागची कारणं दोन आहेत.

  पहिलं कारण म्हणजे एक पोहोण्याचा व्यायाम सोडला तर बाकी बहुतेक सगळे एरोबिक व्यायाम हे फक्त शरीराच्या खालच्या अर्ध्या भागाला व्यायाम देतात. पण फिटनेस म्हणजे काही फक्त पाय आणि पाठ नव्हे. शरीराचा वरचा अर्धा भागही आपलाच असतो आणि त्याची काळजीही आपल्यालाच घ्यायची? असते. ती कशी घ्यायची?तर शरीराच्या वरच्या अर्ध्या भागाचाही व्यायाम त्याच वेळी करायचा. म्हणजे कसा? तर एकतर मूळ व्यायाम करतांनाच त्यात अशी काहीतरी भर घालायची की ज्यामुळे अपर बॉडी एक्ससारसाईझ होईल. म्हणजे चालायला किंवा धावायला जातांना हातात वजन घ्यायचं. हे वजन किती असावं? तर सुरुवातीला अगदी अर्धा अर्धा किलो घेतलं तरी पुरेल. त्यासाठी लगेच जाऊन महागाचे डम्बबेल्स आणायची गरज नसते. तर जुन्या कोल्ड ड्रिंकच्या किंवा पाण्याच्या अर्ध्या लिटरच्या किंवा एक लिटरच्या बाटल्यांमध्ये वाळू भरूनही वजनं तयार करता येतात. किंवा चालतांना, धावतांना एकीकडे जर का पेपर मुठीने चुरगळण्याचा व्यायाम केला तर हाताचा पंजा आणि फ़ोरआर्म यांना चांगल्यापैकी व्यायाम होऊ शकतो. त्याचबरोबर तो हात खालीवर हलवला किंवा कोपरातून उघडमीट केला तर दंडाला आणि खांद्यांनाही बराच व्यायाम होऊ शकतो. जिना चढण्याच्या व्यायामात जर का पाठीवर जड पोतं घेतलं तर पाठीला, खांद्यांना, मानेला वगैरे बराच व्यायाम होतोच, पण एकूणच त्या व्यायाम प्रकारात बऱ्याच जास्त कॅलरीजही जळतात. सायकल चालवतांना पायाला वजन बांधून व्यायाम करता येतो. असा काहीतरी विचार करून आपण एरोबिक व्यायामासाठी जो वेळ खर्च करणार असतो त्यातूनच जास्त व्यायाम पदरात पाडून घेऊ शकतो. पण असं करणं दर वेळी शक्य होतंच असं नाही. काही जणींना चालण्याचा वेळ हा एकच निवांत फोनवर बोलण्याचा वेळ असतो. काहीजणींना रिलॅक्स व्हायला, गाणी ऐकायला, ऑडिओबुक्स ऐकायला तेवढाच वेळ असतो. किंवा अगदी नवीन व्यायाम करणाऱ्यांना असे सगळे व्यायाम एकदम करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी काय करायचं?तर एरोबिक व्यायाम संपल्याच्या नंतर वेगळ्याने अपर बॉडी एक्सारसाईझ करायचा, पण करायचाच!

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स