Join us  

व्यायाम करता पण स्ट्रेचिंग करता का? ५ सोपे स्ट्रेचिंग प्रकार, राहा दिवसभर फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:54 AM

अतिशय सोपे आणि १० मिनिटांत होणारे हे व्यायाम करा, दिवसभर टवटवीत राहायला होईल मदत

ठळक मुद्देसकाळी सकाळी शरीराला थोडा ताण दिला तर राहाल ताजेतवाने सोपी आसनं करा आणि आखडलेले स्नायू मोकळे करा

सकाळी उठल्यावर आणि दिवसभर आपला मूड चांगला असेल तर दिवसभराची कामं चांगली होतात. आपण ताजेतवाने असलो की आपल्याला आपोआपच आजुबाजूचे वातावरण चांगले वाटते. मग आपोआपच आपण सकारात्मक होतो आणि मन, मेंदू सगळे एकदम टवटवीत, ताजेतवाने असल्यासारखे वाटत राहते. मुख्य म्हणजे हा टवटवीतपणा थोडाथोडका नाही तर दिवसभर टिकून राहायला मदत होते. यासाठी काही सोपे स्ट्रेचिंग आपण सकाळच्या वेळात आवर्जून करायला हवेत. बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यांमुळे अनेकदा शरीर आखडल्यासारखे होते. पण हे सोपे स्ट्रेचिंग केले तर हा शीण जाऊन तुम्हाला शरीराने आणि मनानेही ताजेतवाने वाटू शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढण्यास मदत होईल. अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्ये होणाऱ्या या स्ट्रेचिंगचे प्रकार पाहूया...

१. लहान मुलांची पोझ 

यामध्ये वज्रासनात बसून हात जमिनीवर पुढच्या दिशेला न्या आणि डोके जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. हे करताना पृष्ठभाग पावलांपासून उचलला जाणार नाही याची काळजी घ्या. खोल श्वास घेऊन मणक्याला ताण पडेल असे बघा. ५ ते १० वेळा असेच करा. सकाळी उठल्यावर अनेकदा आपला पृष्ठभाग, मांड्या, मणका, खांदे काहीसे अवघडलेले असतात. शरीराला थोडा स्ट्रेच दिला की हे अवघडलेले भाग मोकळे होण्यास मदत होते. यामुळे तुमचा मेंदू शांत व्हायला मदत होते आणि तुम्हाला आलेला ताण निघून जातो. हे स्ट्रेचिंग करण्यासाठी तुम्हाला एका योगा मॅटची किंवा सतरंजीची आवश्यकता आहे, जेणकरुन तुमच्या गुडघ्यांना जमिनीमुळे दाबले गेल्यामुळे त्रास होणार नाही. 

(Image : Google)

२. मार्जारासन 

मणक्यामधील द्रव पदार्थांचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी हा योगाप्रकार अतिशय उपयुक्त ठरतो. यामुळे अवघडलेली पाठ आणि मणका मोकळा होण्यास तर मदत होतेच पण पोटाच्या स्नायूंचीही हालचाल झाल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. दिवसभरासाठी पाठीत ऊर्जा हवी असेल तर हा व्यायामप्रकार अतिशय उत्तम आहे. हात आणि गुडघे टेकून एखाद्या प्राण्याप्रमाणे पोझ घ्या.     पाठीच्या मणका एकदा वरच्या दिशेला आणि एकदा जमिनीच्या दिशेला ताणा. असे करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घ्याल तेव्हा पाठ आणि पोट खाली असेल आणि मान वरच्या दिशेला असेल याची खात्री करा. तर श्वास सोडाल तेव्हा पाठ मांजरीप्रमाणे वरच्या बाजुला आलेली असेल असे बघा. 

(Image : Google)

३. अधोमुख श्वानासन 

या स्ट्रेचिंग प्रकारामुळे मज्जासंस्था एकप्रकारे रिचार्ज होते असे आपण म्हणू शकतो. तसेच या व्यायामामुळे मेंदू शांत होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल, त्यामुळे तुमच्या झोपेवर आणि दिवसभराच्या कामांवर त्याचा परिणाम होत असेल तर हा व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतो. यामध्ये हाताच्या तळव्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत प्रत्येक अवयवाला स्ट्रेच मिळत असल्याने काही वेळा हा व्यायामप्रकार केल्यावर शरीर मोकळे झाल्यासारखे वाटते. हाताचे आणि पायाचे तळवे जमिवर ठेवा बाकी सर्व शरीर वर उचला. दोन्ही हातांमधून डोके जमिला टेकेल अशापद्धतीने मागचा भाग वर उचला. पुन्हा डोके पुढे घेऊन हा भाग सरळ रेषेत आणा, असे ५ ते १० वेळा करा. पायाचे आणि पाठीचे स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. 

(Image : Google)

४.  वीरभद्रासन 

या आसनाला पॉवर पोझ म्हणून ओळखले जाते. उभे राहून करायचे हे आसन तुमच्यातील आत्मविश्वास तर वाढवतेच पण पृष्ठभागातील लवचिकता वाढविण्यास मदत करते. या आसनामुळे संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. खांदे, पाठ, दंड, पाय अशा सर्वांचा व्यायाम झाल्यामुळे त्यातली ताकद वाढण्यास मदत होते. तसेच छाती, फुफ्फुसे आणि पृष्ठभागाला ताण पडल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. पायाचा तळवा आणि हाताचे तळवे जमिनीवर टेकवून शरीराचा त्रिकोण करा. एक पाय दोन्ही हातांच्या मध्ये घेऊन दोन्ही हातांचा नमस्कार करा आणि हात वर न्या. असे दोन्ही पायांनी करा. यामुळे संपूर्ण शरीराला अतिशय छान ताण मिळेल आणि तुम्हाला कमी वेळात मोकळे झाल्यासारखे वाटेल. 

(Image : Google)

५. उत्तानासन 

दिसायला सोपे दिसणारे हे आसन करायलाही सोपे आहे. मात्र त्याचे शरीराला होणारे फायदे अतिशय अमेझिंग असतात.     या आसनामुळे किडणी, यकृत याच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते, तसेच पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. यामुळे तुमचा ताण कमी होऊन तुम्हाला फ्रेश वाटते. या आसनात तुम्ही स्वत:लाच मिठी मारत आहात असे वाटते. खाली वाकून दोन्ही हातने पायाची बोटे धरायची आणि डोके गुडघ्याला टेकेल असा प्रयत्न करायचा. यामुळे कंबर, पोट, मांड्या या भागाचा अतिशय चांगला व्यायाम होतो. पाय जमिनीवर घट्ट ठेवून पाच ते १० वेळा हा व्यायाम करावा. यामुळे फ्रेश वाटते.   

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदे