lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > दहा पावलं चालण्याची ताकदही कोवीड काळात गमावली, कोवीड काळात जीममध्ये २५ टक्केच महिला सदस्य!

दहा पावलं चालण्याची ताकदही कोवीड काळात गमावली, कोवीड काळात जीममध्ये २५ टक्केच महिला सदस्य!

अनुष्का शेट्टी ते आलिया भट, करीना कपूर यासाऱ्यांचे फिटनेस व्हीडीओ आपण जेव्हा पाहतो तेव्हा हा प्रश्न स्वत:ला का नाही विचारत की, आपण व्यायाम का करत नाही? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:23 PM2021-03-04T17:23:06+5:302021-03-05T14:31:57+5:30

अनुष्का शेट्टी ते आलिया भट, करीना कपूर यासाऱ्यांचे फिटनेस व्हीडीओ आपण जेव्हा पाहतो तेव्हा हा प्रश्न स्वत:ला का नाही विचारत की, आपण व्यायाम का करत नाही? 

Did you even lose the strength to walk ten steps during the Kovid period? | दहा पावलं चालण्याची ताकदही कोवीड काळात गमावली, कोवीड काळात जीममध्ये २५ टक्केच महिला सदस्य!

दहा पावलं चालण्याची ताकदही कोवीड काळात गमावली, कोवीड काळात जीममध्ये २५ टक्केच महिला सदस्य!

Highlightsअलीयाने गेल्याच वर्षी वेट लिफ्टिंगचा एक व्हीडीओ पोस्ट केला होता, त्यात जी जबरदस्त वजन उचलताना दिसते.

-चिन्मय लेले


अनुष्का शेट्टी. मुर्तीमंत सौंदर्य. मात्र केवळ रुप नव्हे तर तिच्या फिटनेसचीही चर्चा असतेच. अलीकडेच तिचं एक पुस्तकंही प्रसिध्द झालं. मॅजिक वर्क लॉस पील असं त्या पुस्तकाचं नाव. या पुस्तकात ती थोडेथोडके नव्हे तर ६२ लाइफस्टाइल चेंजेस सांगते. आता ६२ हा आकडा वाचूनच आपल्याला धाप लागणार कारण इथं एक सवय बदलायची तर ते जमत नाही. नव्याचे नऊ दिवस पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं अनेकींच्या व्यायामचं होतं. तर ६२ बदल कधी करणार? मात्र अनुष्का सारखा ग्लो आणि रुप हवं असेल तर ती जे करते त्या दिशेनं तरी आपल्या जायला हवं. आपण वाचत असतोच की करीना दिवसाला शंभर सूर्यनमस्कार घालते. अगदी गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अनुष्का शर्मा ट्रेडमिलवर व्यायाम करत होती. सेरेना विल्यम्स तर गरोदर असताना कोर्टवर उतरली होती. शिल्पा शेट्टी तर इतकी योगासनं करते की, ते पाहून कुणीही थक्कं व्हावं. हे मान्य केलं की, या सर्व जणींसाठी त्यांचा देह ही त्यांची गुंतवणूक आहे म्हणून आपल्या दिसण्याविषयी त्या सजग असतात. मात्र केवळ ‘दिसण्याविषयी’ असतात का? तर या प्रश्नाचं उत्तर आता नाही असंच द्यावं लागेल. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलीया भट आणि श्रध्दा कपूर. अलीयाने गेल्याच वर्षी वेट लिफ्टिंगचा एक व्हीडीओ पोस्ट केला होता, त्यात जी जबरदस्त वजन उचलताना दिसते. मग मुद्दा हा की, हे जे फिटनेसचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे, त्या वाटेनं अन्य मुलींनीही चालून पहायला काय हरकत आहे?

-अर्थात हरकत काहीच नाही मात्र अजूनही भारतासारख्या देशात तरुण मुलींनी व्यायाम करणं, खेळणं हे सारं लाइफस्टाइलच्या हेल्दी वर्तुळात येत नाही.  साधारण भारतीय फिटनेस आणि वेलनेस मार्केट हे २०१७ मध्ये १०० कोटी रुपयांचे होते. ते २०२० पर्यंत वेगात वाढणं अपेक्षित होतं मात्र गेल्या वर्षी कोवीड १९ मुळे या बाजारपेठेला धक्का बसला. जीम बराच काळ बंद होते. आता ते सुरु झालेले असले तरी पूर्वी जितक्या महिला जीमला जात होत्या त्यांची संख्या रोडावलेली आहे असं अलीकडच्या अनेक बातम्या सांगतात. विविध जीमची आकडेवारी सांगते की जीममधला मेल-फीमेल रेशो हा ७५:२५ असा झालेला आहे. म्हणजेच जीमला येणाऱ्या महिलांची संख्या जेमतेम २५ टक्के आताही दिसते. 

 

यासंदर्भात पर्सलन ट्रेनर अमर माळी सांगतात की, मुळात महिला जीमला येतात त्यातही तरुणी तर त्यांचा मूळ उद्देश हा केवळ वजन कमी करणं एवढ्यापुरताच मर्यादित असतो. फिटनेस गोल म्हणून, लाइफस्टाइलचा भाग म्हणून त्या अजूनही जीमला येत नाहीत. वजन कमी असलेल्या काही मुली जीमला जेव्हा येतात तेव्हा लग्न जमत नाही म्हणून तब्येत सुधारायला हवी एवढ्यापुरताच त्यांचा हेतू मर्यादित असतो. आपलं आरोग्य चांगलं व्हावं, आपण फीट व्हावं असं म्हणून जीमला येणाऱ्या तरुणींची संख्या नगण्य आहे आणि तेच सर्वात दु:खद आहे.

याचसंदर्भात मॅराथॉन रनर डॉली दिवेचा सांगतात की, गेल्या वर्षीपर्यंत अनेकींना आपण मॅराथॉन रनिंग करुन पहावी असं एक मोठं लक्ष्य मिळालं होतं. मात्र नेमका कोवीड काळ आला आणि सर्व प्रकारच्या रनिंग स्पर्धा बंद झाल्या. त्यामुळे जे एक लक्ष्य मिळालं होतं ते ही गेलं. आणि अनेकींचं पळणंच काय चालणंही थांबलं. 
हे चालणं, पळणं व्यायाम करणं थांबलं ही आताच्या घडीला तरुणींच्या जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे.
‘चालायला लागणं’ खरंतर इतकं सोपं आहे पण नेमका कुठं आपल्या मनात ब्लॉक आहे. तो ब्लॉक आपल्याला व्यायाम का करु देत नाही? -या प्रश्नाची उत्तरं शोधायला हवीत..
मुख्य म्हणजे ती स्वत:ची स्वत:लाच शोधावी लागतील..
 



( चिन्मय मुक्त पत्रकार आहे.)

Web Title: Did you even lose the strength to walk ten steps during the Kovid period?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.