Join us

पळणाऱ्या महिलांना छळणाऱ्या नजरांचं करायचं काय? चालण्याचा-पळण्याचा व्यायाम करणाऱ्या महिला सुरक्षित का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2024 16:16 IST

युरोपातल्या ब्रॅडफोर्ड शहरातली गोष्ट, पण ती त्या शहरापुरती मर्यादित नाही.

ठळक मुद्देहा प्रश्न एका शहरापुरता चर्चेत असला तरी हे वास्तवच आहे की अजूनही पळणाऱ्या महिलेकडे पाहणाऱ्या नजरा जगभरातच अनेक ठिकाणी बदलतात.

माधुरी पेठकर४५ वर्षांची सफया खान. गेली कित्येक वर्षांपासून धावण्याचा सराव करते. लंडन, बर्लिन मॅरेथाॅनमध्ये तिने भागही घेतला होता. पण, धावण्याचा सराव करताना तिने स्वत:साठी काही नियम घालून घेतले. धावण्याचा सराव रस्त्यावर नाही तर पार्कमध्येच करायचा. संध्याकाळी तर धावण्याचा सराव करायचाच नाही. सकाळी लवकर उठायचं, पार्कमध्ये धावायचं, रस्त्यावर गर्दी होण्याआधीच घरी परतायचं. ब्रॅडफोर्ड हे लंडनमधील शहर.

काही महिन्यांपूर्वी 'मॅंचेस्टर युनिव्हर्सिटी'ने एक अहवाल प्रसिद्ध केला. ब्रॅडफोर्ड पोलिसांचं मग या समस्येकडे लक्ष गेलं. हा अहवाल सांगतो की, ब्रॅडफोर्डमधील बहुतांश महिलांना रस्त्यावरून पळताना पुरुषांची असभ्य टीका सहन करावी लागते. पुरुष महिलांना सुरक्षित वाटणार नाही असे वर्तन करतात. या अहवालातील बाबींची सतत्या पडताळण्यासाठी पोलिसांनी शहरातील पार्करन्सला हजेरी लावली. तेथील महिलांना रस्त्यावरून धावण्याच्या अनुभवाबद्दल विचारलं, तेव्हा एक-एक करून अनेक महिलांनी पोलिसांना 'आपबीती' सांगितली. महिलांच्या बाबतीतलं हे त्रासदायक वास्तव बदलण्यासाठी ब्रॅडफोर्ड शहरातील पोलिसांनी पुढाकार घेऊन 'जाॅगऑन कॅम्पेन' सुरू केलं. या मोहिमेत प्रत्यक्ष धावणाऱ्या आणि धावताना असभ्य टीकांनी हैराण झालेल्या महिलांनी, शहरातील संस्थांनी सहभाग घेतला.जाॅगऑन कॅम्पेनमध्ये सहभागी झालेले पोलिस आणि महिला आता शहरातील विविध समूहांना भेट देत आहेत. धावणाऱ्या महिलांवर होणाऱ्या असभ्य टीकेबाबत लोकांमध्ये जाणीव जागृती करत आहेत. अशी घटना जेव्हा आपल्यासोबत होते तेव्हा आवाज उठवायला हवा ही जाणीव महिलांमध्येही निर्माण केली जात आहे.

 

जाॅगऑन कॅम्पेनमुळे आजपर्यंत या विषयावर कधीही न बोललेल्या महिला बोलू लागल्या आहेत. रस्त्यावरुन सुरक्षितरीत्या पळणे हा आपला हक्क आहे त्यासाठी आपण बोलायला हवं याची जाणीव ब्रॅडफोर्ड शहरातील महिलांमध्ये निर्माण होत आहे.

हा प्रश्न एका शहरापुरता चर्चेत असला तरी हे वास्तवच आहे की अजूनही पळणाऱ्या महिलेकडे पाहणाऱ्या नजरा जगभरातच अनेक ठिकाणी बदलतात. त्या नजरा टाळायच्या म्हणून अनेक जणी इच्छा असूनही पळत नाहीत. 

टॅग्स :फिटनेस टिप्ससोशल व्हायरलमहिला