Join us  

मुळात आपल्याला व्यायाम का करायचा आहे? काय तुमचा WHY

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 7:26 PM

बारीक होण्यासाठी व्यायाम करु असं अनेकजणी म्हणतात, पण त्या बारीकही होत नाहीत, व्यायामही सलग करत नाही, मग नेमकं चुकतं कुठं?

ठळक मुद्देबारीक होण्याचा संबंध व्यायामाशी तुलनेने कमी असतो. मग तो कशाशी असतो?

गौरी पटवर्धन 

चला, आता व्यायाम करुच असं आपण ठरवतो तेव्हा नक्की आपल्याला व्यायाम का करायचा असतो. म्हणजे आपण स्वत:ला विचारतो का हा प्रश्न की, कशासाठी करणार आपण ही कसरत?तर त्याचं उत्तरं आपण शोधलं पाहिजे. व्यायाम करायला सुरुवात करतांना आपल्या मनात एका गोष्टीची स्पष्टता पाहिजे, ती म्हणजे आपल्याला व्यायाम का करायचा आहे? यापैकी ‘बारीक व्हायला’ हे कारण आपण तूर्तास बाजूला ठेऊ. कारण एक म्हणजे तो उद्देश जवळजवळ सगळ्यांचजणींचा बहुतांश असतोच आणि दुसरं म्हणजे ‘बारीक होणं’ याचा व्यायामाशी तुलनेनं कमी संबंध आहे.बारीक होण्याचा व्यायामही कमी संबंध असतो हे समजल्यानंतरसुद्धा ज्या कोणी व्यायामाचा विचार करतील त्या फिटनेसबाबत थोड्या तरी सिरीअस आहेत असं आपण म्हणू शकतो.

तर व्यायाम का करायचा?१. एनर्जेटिक वाटण्यासाठी२. ताकद कमावण्यासाठी३. फिगर चांगली होण्यासाठी४. स्किनवर ग्लो येण्यासाठी५. आत्ता होत असलेले त्रास-दुखणी कमी करण्यासाठी६. भविष्यात होऊ शकणारे त्रास-दुखणी टाळण्यासाठी७. मजा येते म्हणून असे अनेक उद्देश व्यायाम सुरु करण्यामागे असू शकतात. आपण त्या सगळ्या उद्देशांचा सविस्तर विचार करू. पण त्याआधी ‘बारीक होणे’ या विषयाचा आधी सोक्षमोक्ष लावून टाकू. बारीक होण्यासाठी व्यायाम करणारी उदंड जनता आपल्याला अवतीभोवती दिसत असते, पण त्यांच्यापैकी किती जणी प्रत्यक्षात बारीक झालेल्या दिसतात? नीट शांतपणे आठवून बघितलं तर लक्षात येतं, की त्यांच्यापैकी फारच थोड्या जणी बऱ्यापैकी बारीक झालेल्या आहेत. बाकी सगळ्या जणींनी काही काळानंतर सपशेल हार मानलेली आहे. 

असं का होतं? कारण बारीक होण्यासाठी वजन कमी करण्यासाठी जेवढा आणि जेवढा काळ व्यायाम करायला लागतो तो हौशी व्यायाम करणारे ऑलमोस्ट कधीच करू शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी एरोबिक एक्सरसाईज करायला लागतो हे आपल्याला माहिती असतं. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे काय? तर जे व्यायाम सतत काही काळ करता येतात आणि जे करतांना आपल्या हृदयाची गती वाढते ते व्यायाम म्हणजे एरोबिक एक्सरसाइज. उदा. चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहोणे, जिना चढणे इत्यादी.तर असे कमी ताकद लागणारे व्यायाम बराच वेळ? केले की वजन कमी होतं हे खरंय. पण बराच म्हणजे किती वेळ? तर कमीत कमी पाऊण तास. कारण आपण व्यायाम सुरु केल्यानंतरची पहिली जवळजवळ वीस मिनिटं आपल्या शरीरातली कार्बोहायड्रेट्स शरीर वापरतं. शरीरात साठवलेली अतिरिक्त चरबी जळायला त्यानंतर सुरुवात होते. ही चरबी जाळल्याशिवाय काही आपलं वजन कमी होऊ शकत नाही किंवा आपण बारीकही होऊ शकत नाही. त्यामुळे ही चरबी जास्तीत जास्त काळ जळत ठेवणं हे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असतं. म्हणून पहिली वीस अधिक पुढची पंचवीस अशी पंचेचाळीस मिनिटं तरी एरोबिक व्यायाम केला पाहिजे, आणि खरं म्हणजे तो एक ते दीड तास केला पाहिजे.

पण अडचण अशी आहे की हौशी व्यायाम करणाऱ्यांना एक तास व्यायाम करण्याइतका फिटनेस कमावेपर्यंत त्यांचा उत्साहच संपून जातो. आणि त्यातूनही एखादीने तिथवर मजल मारली, तरी ती बारीक होतांना दिसत नाही, असं का होतं?त्याचं प्रामाणिक उत्तर तेच आहे, सुरुवातीला दिलेलंत्याविषयी पुढच्या भागात..

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स