प्रियांका परदेशी
प्रत्येक दिवाळीत घर आवरताना आपल्याला हा प्रश्न पडतोच की आपण एवढा पसारा का वाढवला? कपड्यांची कपाट आवरणं तर फार अवघड. पूर्वी लोक फक्त दिवाळीत कपडे घेत आता वर्षभर कपडे घेतले जातात. एकदा घातलेला कपडा पुन्हा केव्हा अंगाला लागेल सांगता येत नाही. त्यात कपाटं कपड्यांनी भरुन वाहू लागतात. ऐनवेळी पुन्हा तोच प्रश्न की कुठं जायचं तर घालायला हाताशी काहीच चांगला नाही. मग प्रश्न पडतो की कपड्यांची कपाटं आवरायची कशी?
पसारा आवरायचा कसा?
१. जे कपडे रोज घालतो ते एका वेगळ्या कप्प्यात ठेवा. मोजके कपडे विकत घ्या, मोजकेच वापरा. कॅप्सूल वॉर्डरोब तयार करा.
२. साड्या ब्लाऊज परक वेगळ्या कप्प्यात ठेवा.
३. नेहमी न लागणारे, सणावारी, लग्नकार्याला घालायचे कपडे वेगळे ठेवा.
४. शाली, गरम कपडे वेगळे ठेवा.
५. पर्सेस, दागिने यासाठी वेगळी जागा. ऑर्गनायझर डबे घ्या.
६. कपड्यांच्या घड्या नीट घाला. रोजच्या रोज आपले कपाट नीट ठेवा.
७. काहीच वेळच्यावेळी सापडत नाही असं होत असेल तर अनावश्यक कपडे, पसारा कमी करा.
८. जे कपडे गेल्या अनेक वर्षांत वापरले नाहीत, ते आपण कधीच वापरणार नाही असं समजा. अपवाद साड्या. पण त्या साड्याही आपल्या बहिणी, मैत्रीणी यांना देता येतील का विचार करा.
९. न होणारे कपडे वजन कमी झाल्यावर घालू हा गैरसमज आहे. तसे कधीच होत नाही.
१०. मोजके कपडे घ्या.मोजकेच वापरा. सुंदर दिसण्याचा हाच सोपा मार्ग आहे. कपड्यांचं सॉर्टिंग नीट केलं तर गडबड होत नाही.
११. कपड्यांचं कपाट रेडीमेड विकत घेताना किंवा बनवून घेतानाही ते आपल्या सोयीनं बनवून घ्यावं.
१२. कपाटात आतल्या कपड्यांसाठीचा वेगळा ड्रॉवर असला पाहिजे. म्हणजे त्या कपड्यांची सरमिसळ होणार नाही.
१३. प्रत्येक दागिना लहान लहान झिपलॉकच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत नीट ठेवला तर ते हरवत नाही आणि चटकन सापडतात.
१४. कपाट वर्षातून एकदा नाही तर महिन्यातून किमान एकदा तरी आवरायलाच हवं.