गुढी पाडव्याला नऊवारी तर हवीच! पारंपरिक सण, गुढी उभारण्याचा उत्साह आणि त्यात नऊवारी साडीचा साज असेल तर सणाची शोभा अधिकच वाढते. नऊवारी साडीचा लूक आकर्षक दिसण्यासाठी ती नीट आणि व्यवस्थित नेसणं महत्त्वाचं असतं. थोड्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नऊवारी साडी अधिक सुंदर दिसते आणि दिवसभर आरामदायकही वाटते.
नऊवारी साडी नेसताना सर्वात आधी साडीचे कापड योग्य असणे महत्त्वाचे आहे. खूप जड किंवा खूप पातळ कापड असेल तर साडीच्या घड्या नीट बसत नाहीत. त्यामुळे कॉटन, हलकं सिल्क किंवा पारंपरिक कापडाची साडी निवडली तर नऊवारी अधिक नीट दिसते. त्याचबरोबर साडीची लांबीही योग्य असणे आवश्यक असते. नऊवारी साधारण आठ ते नऊ गजांची असल्यामुळे योग्य लांबीची साडी असेल तर कासोटा आणि पुढच्या घड्या व्यवस्थित बसतात.
नऊवारी नेसताना आरामदायक इनरवेअर किंवा लेगिंग घातले तर चालताना आणि बसताना अधिक सोयीस्कर वाटते. यामुळे साडी सांभाळणंही सोपं होतं. साडी नेसताना मधला कासोटा हा भाग व्यवस्थित बसणं खूप महत्त्वाचं असतं. कासोटा खूप सैल असेल तर साडीचा लूक ढिला दिसतो आणि खूप घट्ट असेल तर चालताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तो घट्ट पण आरामदायक असावा.
नऊवारीचा लूक उठावदार दिसण्यासाठी पुढच्या घड्या समसमान असणंही आवश्यक असतं. घड्या नीट बसल्या तर साडी व्यवस्थित दिसते आणि चालताना देखील साडी सांभाळायला सोपं जातं. त्याचप्रमाणे पदर नीट पसरवला तर संपूर्ण लूक अधिक आकर्षक दिसतो. अगदी लहान पदर काढण्यापेक्षा जरा जाड काढा. गरज वाटल्यास छोट्या पिनचा वापर करुन पदर व्यवस्थित सेट करता येतो. खालीही दोन पिन लावा.
नऊवारी नेसताना केळ काढणं गरजेचं असतं. त्यामुळे साडी समोरुन अजिबात सुटत नाही. मस्त दिसते. तसेच मागील बाजूला निऱ्या समान आल्या की मागून साडी सुंदर दिसते. त्यामुळे निऱ्या काढताना अजिबात घाई करु नका.
नऊवारी साडीचा साज पूर्ण करण्यासाठी पारंपरिक दागिनेही महत्त्वाची भूमिका बजावतात. चंद्रकोर बिंदी, नथ, गजरा, काचेच्या बांगड्या किंवा कमरपट्टा वापरला तर नऊवारीचा पारंपरिक लूक अधिक खुलून दिसतो. थोडा सराव आणि योग्य पद्धत वापरली तर गुढी पाडव्याला नेसलेली नऊवारी साडी नक्कीच उठून दिसते आणि सणाचा आनंदही अधिक वाढवते.
