Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षितच्या लग्नाला झाली २२ वर्षे, ती सांगतेय तिच्या सुखी संसाराचं गोड गुपित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 16:06 IST

बॉलीवूडमध्ये लग्नाच्या गाठी झटपट बांधल्या जातात आणि तेवढ्याच फटाफट तोडल्याही जातात. याला मात्र अपवाद आहे आपली मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दिक्षित. तिने सांगितलंय तिच्या सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य.

ठळक मुद्देआज ज्या बॉलीवूडमध्ये ५- ६ वर्षे लग्न टिकलं तरी खूप झालं, अशी परिस्थिती आहे, तिथे माधुरी तिची चक्क २२ वी ॲनिव्हर्सरी साजरी करत आहे.

'सिर्फ नाम ही काफी है......' असं काही मोजक्या व्यक्तींबाबत बोललं जातं. या व्यक्ती अशा असतात की खरोखरंच त्यांचं नावच त्यांची अख्खी ओळख सांगून जातं. अशा व्यक्तींपैकीच एक म्हणजे माधुरी दिक्षित. बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री झाल्या, होत आहेत आणि भविष्यातही होतील. पण ज्या काही मोजक्या अभिनेत्री कायमस्वरूपी त्यांचं वर्चस्व टिकवून ठेवतात आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करतात, अशा अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे माधुरी दिक्षित. तिची नुसती एक झलक दिसण्यावर, तिच्या असण्यावर, तिच्या हसण्यावर आणि तिच्या नृत्यावरही तिचे चाहते अक्षरश: जीव ओवाळून टाकतात.

 

अशीच लाखो काय करोडो दिलांची धडकन असणारी माधुरी जेव्हा बॉलीवूडमध्ये करिअरच्या सर्वोच्च स्थानी होती, तेव्हा डॉ. श्रीराम नेने तिच्या आयुष्यात आले आणि अगदी सर्वसामान्य मुलीप्रमाणे सगळ्या परंपरा, सगळे रितीरिवाज सांभाळत माधुरीने पालकांच्या मर्जीने त्यांच्याशी विवाह केला. १७ ऑक्टोबर १९९९ साली माधुरी आणि श्रीराम यांचा विवाह झाला आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यामुळे लग्नानंतर काही वर्षे माधुरी चित्रपटांपासून आपोआपच दूर झाली. त्यानंतर मागील काही वर्षांपासून ती पुन्हा भारतात वास्तव्यास असली, तरीही बाॅलीवूडपासून ती दूरच आहे. पण तिचे सगळ्यात मोठे यश म्हणजे बॉलीवूडपासून दूर राहूनही ती कधीच चाहत्यांपासून दूर गेली नाही. ती करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना तिच्यावर जेवढे लोक भरभरून प्रेम करायचे, तेवढेच प्रेम तिला आजही मिळते. 

 

अभिनय, करिअर यामध्ये माधुरी जशी एक्सपर्ट होती, तेवढीच निपूण ती संसारातही आहे. त्यामुळेच तर माधुरी आज डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत २२ वी ॲनिव्हर्सरी साजरी करत आहे. सध्या माधुरी इन्स्टाग्रामवर खूपच ॲक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे व्हिडियो, डान्स, फोटो ती कायम इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळे लग्नाचा २२ वा वाढदिवसही तिने एक व्हिडियो टाकून इन्स्टाग्रामवर दणक्यात साजरा केला आहे. तब्बल दिड मिनिटांचा हा व्हिडियो असून माधुरीने त्यामध्ये त्यांच्या लग्नापासून ते आजपर्यंतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

 

लग्नापुर्वी माधुरीचे नाव अनेक जणांसोबत जोडले गेले. पण जसा विवाह झाला, तशी माधुरी या सगळ्या चर्चांपासून अलिप्त झाली. अतिशय प्रेमाने आणि विश्वासाने तिने तिचे आणि डॉ. श्रीराम यांचे नाते जपले. म्हणूनच तर आज ज्या बॉलीवूडमध्ये ५- ६ वर्षे लग्न टिकलं तरी खूप झालं, अशी परिस्थिती आहे, तिथे माधुरी तिची चक्क २२ वी ॲनिव्हर्सरी साजरी करत आहे. त्या दोघांमध्ये काही खटके उडाले, काही भांडणं झाली अशी चर्चा मिडियामध्ये कधीच रंगली नाही. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे डॉ. श्रीराम नेने यांच्यामध्ये असणारे काही गुण, असं माधुरी सांगते.

 

माधुरी म्हणते डॉ. श्रीराम यांचा 'हा' गुण सगळ्यात महत्त्वाचामाधुरी म्हणते की प्रत्येक मुलीला आपल्या नवऱ्यामध्ये काही गुण असणं अपेक्षित असतं. ते सगळे गुण डॉ. श्रीराम यांच्यामध्ये आहेत. पती म्हणून ते परफेक्ट आहेतच, पण एक व्यक्ती म्हणूनही खूपच चांगले आहेत, असं माधुरी त्यांच्याबद्दल भरभरून बोलताना सांगते. माधुरी म्हणते कोणतंही नातं टिकवायचं असेल, तर तुमचा त्या व्यक्तीवर खूप विश्वास पाहिजे असतो. आपण एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच विश्वास ठेवतो, जेव्हा ती व्यक्ती आपल्याशी प्रामाणिक आहे, याची आपल्याला खात्री पटलेली असते. डॉ. श्रीराम यांच्यात अनेक चांगले गुण आहेत, त्यापैकी त्यांचा प्रामाणिकपणा आपल्याला सर्वाधिक भावतो, असेही माधुरी सांगते.

 

हे गुपित आहे, माधुरीच्या सुखी संसाराचंमाधुरीने एका मुलाखतीत सांगितलं आहे की तिच्या आणि डॉ. श्रीराम यांच्या काही गोष्टी अतिशय सारख्या आहेत, तर काही गोष्टी कमालीच्या विसंगत. पण तरीही आम्ही दोघांनीही कधीही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आपला जोडीदार जसा आहे, तसं आम्ही दोघांनीही एकमेकांना स्विकारलं आहे. जर तुम्ही नेहमीच तुमच्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न कराल, त्याला स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागायला लावाल, तर तुमचं नातं फार काळ टिकणार नाही. असं आमच्या दोघांमध्ये कधीच होत नाही, हेच तर आमच्या सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य आहे, असं माधुरी सांगते. 

 

टॅग्स :सेलिब्रिटीमाधुरी दिक्षितबॉलिवूड