चीनला आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्षेत्रात आपलं महत्त्व प्रस्थापित करायचं आहे. यासाठी चीन विविध पावलं उचलत आहे. चीनने आता एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत शालेय मुलांना AI चं ट्रेनिंग दिलं जाईल. राजधानी बीजिंगच्या शाळांमध्ये एआय शिक्षण सुरू होत आहे. १ सप्टेंबर पासून मुलांना हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलं दरवर्षी कमीत कमी ८ तास AI ट्रेनिंग घेतील. सहा वर्षांची लहान मुलंही चॅटबॉट्स वापर करायला शिकणार आहेत.
फॉर्च्यूनच्या रिपोर्टनुसार, शाळांमध्ये मुलांना AI ची बेसिक माहिती दिली जाईल आणि एथिक्स शिकवले जातील. बीजिंग म्युनिसिपल एज्युकेशन कमिशनने जाहीर केलं आहे की, शहरातील शाळा सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीसारख्या विषयांमध्ये एआय शिक्षणाचा समावेश करू शकतात. त्यांच्याकडे स्वतंत्र अभ्यासक्रम म्हणून एआय शिकवण्याचा पर्याय देखील आहे. आयोगाने AI मध्ये दीर्घकालीन अभ्यासक्रम तयार करण्याची योजना देखील जाहीर केली आहे. ते AI शिक्षण प्रणाली तयार करतील, शाळांना पाठिंबा देतील आणि AI शिक्षणाला प्रोत्साहन देतील.
देशभरातील १८४ शाळांची निवड
चीनला एआय शिक्षण लवकर सुरू करणं खूप महत्त्वाचं वाटतं. जर हे केलं तर ते एआय इंडस्ट्रीत आघाडीवर राहण्यास मदत करेल असा त्यांचा विश्वास आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या शिक्षण मंत्रालयाने देशभरातील १८४ शाळांची निवड केली जिथे पायलट प्रोग्राम म्हणून एआय प्रोग्राम शिकवले जाणार होते. चीनचे शिक्षण मंत्री हुआई जिनपेंग यांनी AI चं महत्त्व अधोरेखित केलं.
AI तज्ज्ञांची नवीन पिढी
अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, AI शिक्षण लवकर सुरू केल्याने तंत्रज्ञानात नवीन कल्पना येतील. बीजिंगचा दृष्टिकोन हांग्झूमधील झेजियांग युनिव्हर्सिटीपासून प्रेरित असावा. या युनिव्हर्सिटीने डीपसीकचे संस्थापक आणि सीईओ लियांग वेनफेंग आणि युनिट्रीचे वांग जिंगशिंग यांसारखे मोठे टेक लीडर निर्माण केले आहेत. शाळांमध्ये एआयचा समावेश करून चीन AI तज्ज्ञांची एक नवीन पिढी तयार करू इच्छित आहे.