केसांच्या विविध समस्या हल्ली सर्वांसाठीच त्रासदायक ठरत आहेत. केस पांढरे झाले की टेन्शन येतं. वय वाढलं की केस पिकतात पण हल्ली स्ट्रेसमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे केस लवकर पांढरे होतात. पण आता चिंता करण्याची गरज नाही कारण हेच पांढरे केस तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आणि आरोग्यदायी असू शकतात. एका नव्या रिसर्चनुसार, केस पांढरे होणं ही प्रक्रिया प्रत्यक्षात एका जीवघेण्या कॅन्सरपासून तुमच्या शरीराचा बचाव करणारी नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे.
अमेरिकेतील 'न्यूयॉर्क पोस्ट' वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, जपानमधील टोकियो विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'नेचर सेल बायोलॉजी' या प्रतिष्ठित जर्नलमध्ये हा रिसर्च प्रसिद्ध झाला आहे. या रिसर्चनुसार, केस पांढरं होणं आणि मेलानोमा नावाचा त्वचेचा कॅन्सर या दोन गोष्टींचा थेट संबंध आहे. मेलानोमा हा त्वचेच्या कॅन्सरचा सर्वात धोकादायक प्रकार मानला जातो, जो वेळीच निदान न झाल्यास शरीरात वेगाने पसरू शकतो.
संशोधकांनी केसांच्या मुळाशी असलेल्या 'मेलानोसाइट स्टेम सेल्स' चा अभ्यास केला. यामुळे केसांना रंग मिळतो. शरीरावर येणाऱ्या तणावामुळे जेव्हा DNA चं नुकसान होतं, तेव्हा शरीरात दोन प्रकारे प्रतिक्रिया होते.एक प्रकार म्हणजे या सेल्स धोका पत्करून विभाजित होणं सुरू ठेवतात, ज्यामुळे ट्युमर तयार होण्याचा आणि कालांतराने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
दुसरं म्हणजे सेल्स विभाजित न होता, केसांच्या रंगाच्या प्रणालीतून बाहेर पडतात. यामुळे केसांचा रंग जातो आणि ते पांढरे होतात. तुमचे पांढरे झालेले केस हे वाईट गोष्ट नसून एक प्रकारची 'संरक्षणाची ढाल' आहे. तुमच्या शरीराने अत्यंत हुशारीने कॅन्सरचा धोका पत्करण्याऐवजी फक्त केसांचा रंग सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
संशोधकांनी स्पष्ट केलं आहे की, पांढरे केस थेट कॅन्सर बरा करत नाहीत, पण ते हे दाखवतात की सेल्सनी धोका टाळण्यासाठी योग्य वेळी 'सेल्फ-डिफेन्स मोड' एक्टिव्ह केला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आरशात पांढरे केस पाहाल, तेव्हा तुमचं वय वाढलंय असं न समजता तुम्ही सुरक्षित आहात असं समजून रिलॅक्स राहा.
 
