Long Hair Home Remedies : दाट, लांब आणि काळे केस प्रत्येक महिलेची इच्छा असते. असे केस मिळाले तर महिलांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. मात्र, पोषणाची कमतरता, वाढतं प्रदूषण, केसांची योग्य काळजी न घेणे, हार्मोन्सचं असंतुलित होणं इत्यादी कारणांमुळे अनेकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. अशात वर्षानुवर्षे वापरले जाणारे काही नॅचरल उपाय केले तर नक्कीच फायदा मिळू शकतो. पण त्याबाबत अनेकांना माहीत नसतं. आयुर्वेदानुसार, आवळा, ब्राम्ही आणि मेथी या तीन गोष्टी अशा आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्हाला लांब, दाट आणि काळे केस मिळू शकतात. यासाठी त्यांचा वापर कसा करावा हे माहीत असणंही तेवढंच गरजेचं असतं. चला तर तेच जाणून घेऊ.
आवळा केसांसाठी वरदान
आवळ्याला आयुर्वेदात केसांसाठी अमृतसारखं मानलं गेलं आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांचे मूळ मजबूत करतात. आवळ्याच्या मदतीनं केसगळती थांबते, केस पांढरे होत नाहीत. सोबतच डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं.
कसा वापराल?
आवळ्याचा रस काढून डोक्याच्या त्वचेला लावा आणि ३० मिनिटांनंतर धुवून घ्या. आवळ्याचं पावडर खोबऱ्याच्या गरम तेलात मिक्स करून केसांची मालिशही करू शकता. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल.
ब्राम्ही सुद्धा फायदेशीर
ब्राम्ही या औषधी जडी-बुटीचा वापर प्राचीन काळापासून केसांसाठी केला जात आहे. आयुर्वेदातही ब्राम्हीला खूप महत्व आहे. ब्राम्ही केवळ केसांसाठीच नाही तर मेंदुसाठीही फायदेशीर असते. सोबतच केसांची वाढही होते. ब्राम्हीमुळे डोक्यातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं.
कसा कराल वापर?
ब्राम्ही जडी-बुटीचं तेल बाजारात सहजपणे मिळतं. या तेलानं आठवड्यातून दोन वेळा केसांची मालिश करा. इतकंच नाही तर ब्राम्ही पावडर पाण्यात मिक्स करून हेअर मास्कही तयार करू शकता.
मेथीनं केस होतात मजबूत
मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. या दाण्यांमुळे केसांना भरपूर पोषण मिळतं आणि केसांची वाढही होते. यात प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड असतं. जे केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करतं. केसगळती, कोंडा, केस तुटणे, डोक्याच्या त्वचेवर खाज अशा समस्या यानं दूर होतात.
कसा कराल वापर?
मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावा. खोबऱ्याच्या तेलात मेथीचे दाणे हलके गरम करा आणि हे तेल केसांवर लावा. काही वेळानं केस धुवून घ्या.