ब्यूटी ट्रिटमेंट घेताना वाफ घेण्याला अतिशय महत्त्व आहे. आपल्या चेहऱ्यावर धुळ, धूर, माती किंवा मेकअपचे कण साचून राहतात. यामुळे त्वचेची जी रोमछिद्रे असतात ती बंद होतात आणि त्यातूनच पिंपल्स येणे किंवा त्वचेशी संबंधित अन्य समस्या निर्माण होतात. म्हणूनच त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी नियमितपणे वाफ घ्यावी असे सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. पण वाफ कशी आणि केव्हा घ्यावी, किती वेळ घ्यावी, हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे वाफ घेण्याचा योग्य फायदा आपल्याला मिळत नाही.
वाफ घेतल्यामुळे होणारे फायदे
- त्वचेतील तैलग्रंथी मोकळ्या होतात.
- त्वचेवरील रोमछिद्रे मोकळी होऊन त्वचेचे डिप क्लिंजिंग होते. म्हणजेच त्वचा मुळापासून स्वच्छ होते. यामुळे पिंपल्स येण्याचा त्रास खूप कमी होतो.
- मेकअप काढण्यासाठी वाफ घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे
- वाफ घेतल्याने त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्ताभिसरण सुधारले की आपोआपच चेहऱ्यावर ग्लो येतो.
- वाफ घेतल्याने त्वचेवरील मृतपेशी निघून जातात आणि त्वचा नितळ होते.
- वाफ घेतल्याने त्वचेचे योग्य पद्धतीने टाईटनिंग होते.
वाफ घेताना ही काळजी घ्या
१. वाफ घेण्याचा सर्वोत्तम मार्ग
वाफ घेण्याचे दोन ते तीन प्रकार आहेत. पार्लरमध्ये जाऊन आपण जेव्हा क्लिनअप किंवा फेशिअल करतो, तेव्हा तिथे असणाऱ्या उपकरणांच्या साहाय्याने आपल्याला वाफ दिली जाते. असे उपकरण घरी नसल्याने आपल्याला वाफ घेण्यासाठी अन्य पर्याय निवडावे लागतात. ब्यूटी ट्रिटमेंट म्हणून वाफ घेणार असाल तर सगळ्यात योग्य पर्याय म्हणजे पातेल्यात पाणी उकळवणे आणि नंतर कपड्याने चेहरा झाकून घेऊन त्या पाण्याने वाफ घेणे. बाजारात वाफ घेण्याचे जे मशिन मिळतात, त्याचा उपयोग सर्दी- कफ झाल्यावर वाफ घेण्यासाठी योग्य असतो. पण जेव्हा ब्यूटी ट्रिटमेंट म्हणून वाफ घ्यायची असते, तेव्हा पातेल्यात उकळवलेले पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण अशा प्रकारची वाफ ही सौम्य आणि मंद असते.
२. किती मिनिटे वाफ घ्यावी
पाणी गरम आहे, तोपर्यंत वाफ घ्यायची अशी बहुतांश जणांची पद्धत असते. पण पातेल्यात पाणी तापवून वाफ घेणार असाल १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाफ घेऊ नये. जर मशिनच्या साहाय्याने वाफ घेणार असाल तर ३ ते ४ मिनिटे वाफ घ्यावी. कारण मशिनमधून येणाऱ्या वाफेचा फ्लो खूप जास्त असतो. शिवाय मशिनद्वारे वाफ घेताना योग्य अंतर पाळले जाणे, खूप गरजेचे आहे.
३. कोरडी त्वचा असल्यास वाफ नको
जर तुमची त्वचा खूप रूक्ष, कोरडी असेल तर वाफ घेणे टाळावे. वाफ घेतल्यामुळे त्वचेतले नैसर्गिक तेल कमी होऊ शकते आणि त्वचा अधिकच कोरडी होऊ शकते. त्यामुळे काेरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी खूपच कमी प्रमाणात वाफ घ्यावी.