लज्जा चित्रपटात एक संवाद आहे, 'लडका भले काला भूत क्यू ना हो, उसे दुल्हन गोरी ही चाहीए' भारतीय मानसिकतेचे सार जणू काही या वाक्यात एकवटले आहे. या वर्णभेदाचे चटके विशेषतः सहन करावे लागतात ते स्त्रियांना! मग ती लहान मुलगी असो वा कोणी वरिष्ठ अधिकारी! केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांना अलीकडेच हा अनुभव आला आणि त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर मार्मिक पोस्ट लिहिली.
शारदा यांच्या मुख्य सचिव पदाच्या कार्यकाळाची तुलना त्यांच्या पतीच्या कार्यकाळाशी करताना एकाने टिप्पणी केली, 'यांचा कार्यकाळ तेवढाच काळा होता, जेवढा त्यांच्या पतीचा रंग गोरा होता.' थोडक्यात शारदा यांच्या कामावर टीका करताना त्यांच्या रंगालाही हीन ठरवून तोंडसुख घेतले. या विकृत मानसिकतेबद्दल शारदा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून निषेध दर्शवला. मात्र त्यावरही उलट सुलट कमेंट्स येऊ लागल्यावर त्यांनी पोस्ट डिलीट केली. मात्र त्यांनी मांडलेला मुद्दा योग्य असल्याने त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना पुन्हा या विषयावर लिहिण्यास उद्युक्त केले आणि त्यावर अनेक लोकांनी बॉडी शेमिंग विरोधात चर्चा झाली पाहिजे असे मत नोंदवले.
भारतीय मुळातच कृष्णवर्णीय असूनसुद्धा गौरवर्णाचे आकर्षण आजतागायत कमी झालेले नाही. त्यामुळे रंग, रूप, देहबोली, जाड, बारीक यावरून सतत प्रतिक्रिया दिल्या जातात. आज आपण स्वतःला आधुनिक म्हणत असलो तरी समोरच्या व्यक्तीची तिच्या गुणवत्तेवरून पारख न करता व्यक्तिमत्त्वावरून पारख करण्याची मानसिकता अद्याप बदललेली नाही. ती बदलायला हवी.
शारदा लिहितात, 'मी रंगाने काळी आहे यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही. काळ्या रंगाचेही मला वावडे नाही. उलट हा रंग सगळ्या रंगांना सामावून घेणारा आहे. रंगरुपावरुन टिपण्णी करण्याची मानसिकता आता तरी बदलायला हवी असे मला वाटते.'
या पार्श्वभूमीवर आपल्या संतमंडळींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, तुकोबाराय असो नाहीतर माउली, त्यांना काळा-सावळा विठ्ठलही 'राजस सुकुमार' दिसला. कारण त्यांनी देवाचे देवपण पाहिले, रंग रूप नाही. या वर्णभेदावर भाष्य करताना संत चोखामेळा लिहितात-
ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा!
यातून आपण कधी शिकणार?