Rice Shampoo For Hair : भारतीय किचनमध्ये तांदळाचा वापर साधारपणे रोज भात आणि वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तांदळाचा वापर स्कीन आणि हेअर केअरसाठीही केला जातो. तांदळाचा जर योग्यपणे वापर केला तर केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. तांदळामध्ये भरपूर प्रमाणात अमीनो अॅसिड असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. या अॅसिडच्या मदतीनं प्रोटीन आणि केराटीनचं उत्पादन वाढतं. त्याशिवाय तांदळानं डोक्याची त्वचा मॉइश्चराइज होते आणि केसगळतीही थांबते. इतकंच नाही तर यानं कोंड्याची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. तांदळाचं पाणी केसांवर तुम्ही अनेकदा लावलं असेल. आज आम्ही तुम्हाला तांदळापासून शाम्पू बनवून कसं लावाल हे सांगणार आहोत.
कसं तयार कराल?
केस वाढवण्यासाठी तांदळाच्या शाम्पूचा वापर केला जाऊ शकतो. हे शाम्पू किंवा राइस क्लिंझर तयार करण्यासाठी २ चमचे तांदूळ, काही कढीपत्ते, काही जास्वंदाची पानं, कडूलिंबाची पानं, एक चमचा चहा पावडर आणि एक चमचा कोरफडीचा गर हवा. शाम्पू तयार करण्यासाठी या सगळ्या गोष्टी एक कप पाण्यात टाकून शिजवा. हे मिश्रण थंड झाल्यावर यात थोडं कोणतंही शाम्पू मिक्स करा.
तुमचं राइस क्लिंझर केसांवर लावण्यासाठी तयार आहे. या क्लिंझरनं केस धुण्यासाठी आधी केसांवर पाणी टाका आणि नंतर तांदळाचं हे पाणी टाका. हलक्या हातानं ते डोक्यावर फिरवा. यानं केस चांगले स्वच्छ होतील आणि डोक्याची त्वचाही साफ होईल. त्यानंतर डोक्यावर पाणी टाका आणि केस धुवून घ्या. दर आठवड्यात किंवा १५ दिवसातून एकदा या राइस क्लेंजरनं तुम्ही केस धुवू शकता.
डॅमेज झालेले केस रिपेअर करण्यासाठी तांदळाचं पाणी केसांवर लावलं जाऊ शकतं. तांदूळ शिजवून किंवा भिजवून तांदळाचं पाणी तयार करा. हे तांदळाचं पाणी तुम्ही साधं डोक्यावर लावा आणि केस धुवा. तांदळाच्या पाण्यानं केस चमकदार होतात आणि हेअर फॉलिकल्सना पोषण मिळतं. तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून केसांवर लावलं जाऊ शकतं.