प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) ही आपल्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. सिनेसृष्टीपासून दूर असूनही माधुरीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असून ते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. एका यु ट्यूब व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित नेनेनं चमकदार आणि मऊ केसांसाठी खास घरगुती उपाय सांगितला आहे. केसांच्या समस्या आजकाल प्रत्येक मुलीला उद्भवतात. केसांचे हे त्रास टाळण्यासाठी नेहमीच केमिकल्सयुक्त उत्पादनं फायद्याची ठरतात असं नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही लांबसडक, दाट केस मिळवू शकता. (Madhuri Dixit Nene Shares A Magical 3 Ingredients Hair Mask The Secret Behind Her Shiny Hairs)
या व्हिडिओत माधुरीनं बनाना हेअर मास्क कसा करायचा ते सांगितलं आहे. त्याची सोपी पद्धत पाहूया. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी १ पिकलेलं किंवा जास्त पिकलेलं केळं घ्या. १ छोटा चमचा खोबरेल तेल आवश्यक असेल. तसंच अर्धा चमचा मध लागेल.
हेअर मास्क करण्याची कृती
सगळ्यात आधी एक केळी घ्या आणि ते एका बाऊलमध्ये व्यवस्थित कुस्करून घ्या. या मॅश केलेल्या केळ्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल घाला. त्यानंतर त्यात अर्धा चमचा मध मिसळा. मध कमी वापरण्याचा सल्ला तिनं या व्हिडिओत दिला आहे कारण ते खूपच चिकट असते. हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत व्यवस्थित कालवा. हा मास्क केसांच्या मुळांपासून साधारण एक इंच सोडून पूर्ण केसांना खालपर्यंत लावा. हा मास्क केसांना साधारण १५ ते २० मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून टाका.
या घरगुती हेअर मास्कचे फायदे काय आहेत?
केळीमुळे केसांचे खोलवर पोषण मिळते. केसांना मऊ करते आणि त्यातील पोटॅशियम केसांसाठी सुपरफूड म्हणून काम करतात. खोबरेल तेल कोंडा कमी करण्यासाठीसुद्धा फायदेशीर ठरते. यामुळे केसांची नैसर्गिक चमक परत येण्यास मदत होते. मध केसांना नैसर्गिक चमक देतो आणि केसांना मऊ करतो. माधुरी दीक्षित हा मास्क साधारण २० दिवसांतून एकदा वापरते. पण ज्यांचे केस खूपच कोरडे आहेत त्यांनी आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरला हवा.
