Join us

त्वचेसाठी बटाटा ठरतो फायद्याचा? पिगमेंटेशनवर रामबाण उपाय, बटाट्याचा 'असा' करा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2025 14:54 IST

Is potato beneficial for the skin? home remedy for pigmentation, learn how to use it : त्वचेसाठी बटाटा ठरतो चांगला. पाहा कसा वापरावा.

बटाटा हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. घरात बटाटा नाही असे फार क्वचितच पाहायला मिळते. बटाटा चवीला जेवढा छान असतो, तेवढाच आरोग्यासाठीही असतो. सौंदर्य टिकवण्यासाठी केल्या जाणाऱ्या घरगुती उपायांमध्ये बटाटाही उपयुक्त आहे. बटाट्यात त्वचेसाठी लाभदायक अनेक पोषक घटक असतात. (Is potato beneficial for the skin? home remedy for pigmentation, learn how to use it )त्यात जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व बी६, पोटॅशियम आणि नैसर्गिक एन्झाइम्स मोठ्या प्रमाणावर असतात. हे घटक त्वचेला उजळतात, ओलावा टिकवून ठेवतात आणि डाग कमी करण्यात मदत करतात. 

कच्च्या बटाट्यातील रस त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. तो चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील काळेपणा आणि पिगमेंटेशन कमी होते. बटाट्यातील कॅटेकोलेस हे एन्झाइम मेलेनिनचे प्रमाण संतुलित ठेवते, त्यामुळे त्वचेचा टोन एकसारखा दिसू लागतो. ज्यांना उन्हामुळे टॅनिंग किंवा डाग झाले असतील, त्यांनी बटाट्याचा रस नियमित वापरल्यास फरक जाणवतो. ओठांजवळ होणारे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मस्त उपाय आहे.  

बटाट्याचा वापर विविध प्रकारे करता येतो. कापूसाच्या बोळ्याने त्याचा रस चेहऱ्यावर हलकासा लावावा आणि काही वेळाने पाण्याने धुवायचा. फक्त पाण्याचा वापर करुन धुवा. साबण नको. बटाट्याचे काप करुन ते चेहऱ्यावर घासायचे. फेसपॅक करुन लावल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर थंड बटाट्याचे काप काही मिनिटांसाठी ठेवावेत, त्यामुळे सूज आणि काळेपणा दोन्ही त्रास कमी होतात.  

घरगुती कोणताही उपाय करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की प्रत्येकाची त्वचा सारखी नसते. संवेदनशीलता वेगळी असते तसेच पोतही वेगळा असतो. त्यामुळे पिंपल्स असलेल्या त्वचेवर बटाट्याचा थेट रस लावल्यास थोडी जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो. वापरण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. कोरड्या त्वचेसाठी बटाट्यानंतर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे, अन्यथा त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. डेड स्किन बटाट्याने निघते मात्र त्यानंतर चेहऱ्याला कोरफडीचा अर्क लावणे फायद्याचे ठरते. बटाटा हा नैसर्गिकरीत्या त्वचेची काळजी घेणारा, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. नियमित वापराने तो पिगमेंटेशन कमी करतो, चेहरा उजळवतो आणि त्वचेला आरोग्यदायी तेज देतो. मात्र, त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन आणि योग्य प्रमाणात वापरल्यासच त्याचा सर्वाधिक फायदा मिळू शकतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीमहिला