Fenugreek Water Benefits For Hair : केसांच्या वेगवेगळ्या समस्या होणं काही नवीन नसतं. खासकरून महिलांना केसांसंबंधी समस्या अधिक जाणवतात. त्यात हिवाळ्यात तर केसगळती किंवा इतरही समस्या अधिक वाढतात. अशात केसांची काळजी घेण्यासाठी कशाचाही विचार न करता किंवा कुणाच्याही सल्ल्याने महागड्या हेअर प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. पण ते केसांवर खरंच परिणाम करतील याची काहीही खात्री नसते. मात्र आजही बरेच लोक महागड्या स्किन आणि हेअर केअर प्रॉडक्ट्सपेक्षा नैसर्गिक उपायांवर जास्त विश्वास ठेवतात. मेथी हाही असाच एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे, पण त्याचे सगळे फायदे अनेकांना माहिती नसतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
केसांसाठी मेथीचे पाणी
केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण केस मेथीच्या पाण्यानेही धुवू शकता. मेथीच्या पाण्यात असे अनेक घटक असतात, जे केसांना एक-दोन नव्हे तर अनेक फायदे देतात आणि हिवाळ्यात केसांमध्ये होणाऱ्या विविध समस्यांवर दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे केसांशी संबंधित त्रास असल्यास मेथीचे पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मेथीच्या पाण्याचे केसांना होणारे फायदे
मेथीच्या पाण्याने केस धुणे फारच फायदेशीर ठरतं, कारण त्यामध्ये एक चिकट घटक असतो, जो नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो. तसेच मेथीमध्ये असलेले खास प्रकारचं प्रोटीन केसांना पोषण देतं, ज्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते आणि केस मुळापासून मजबूत होतात. तसेच मेथीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-फंगल गुणधर्मही असतात, जे डँड्रफ आणि टाळूला येणारी खाज यांसारख्या समस्या दूर करते.
मेथीचे पाणी कसे वापरावे?
मेथीच्या पाण्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. यासाठी रात्री एका मगमध्ये पाणी घ्या आणि त्यात दोन मूठ मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी मेथी गाळून पाणी वेगळं काढा. या पाण्याने केस पूर्णपणे ओले करा. किमान 20 मिनिटे केस तसेच ओले ठेवा. हिवाळ्यात हे थोडं कठीण वाटू शकतं, त्यामुळे केस ओले करून त्यावर टॉवेल बांधू शकता. 20 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. त्या दिवशी शाम्पू वापरू नका. शॅम्पू करायचा असल्यास, दुसऱ्या दिवशी करू शकता. हा सोपा आणि नैसर्गिक उपाय नियमित केल्यास हिवाळ्यातही केस मजबूत, मऊ आणि निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
