केसांच्या समस्या सध्या खूप वाढलेल्या आहेत. प्रत्येकाची आपापल्या केसांबाबत काही ना काही तक्रार आहेच. काही लोकांचे केस खूप पातळ झालेले आहेत तर काही लोकांच्या केसांना अजिबातच वाढ नाही. केस गळण्याची तक्रारही कित्येकांची असतेच. या तुमच्या केसांच्या तक्रारी कमी करायच्या असतील आणि आपलेही केस छान दाट, लांबसडक, काळेभोर व्हावे असं वाटत असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा (how to use onion to stop hair fall?). हा उपाय करण्यासाठी आपण कांद्याचा वापर करणार असून हा उपाय अगदी सोपा आणि कोणालाही खूप सहज करता येईल असाच आहे.(hair fall treatment using onion juice)
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा उपयोग
आपल्याला माहितीच आहे की कांद्यामध्ये असणारे काही घटक केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतात. कांद्यामध्ये क्युरसेटीन, व्हिटॅमिन सी आणि सल्फर असे काही घटक असतात. त्यापैकी क्युरसेटीन केसांच्या मुळांना पोषण देतं. त्यामुळे मुळं मजबूत होऊन केस गळणं कमी होतं. कांद्यामध्ये असणारं सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करतं. तसेच व्हिटॅमिन सी मुळे केस तुटण्याची समस्या कमी होते. म्हणूनच कांदा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. पुढील प्रकारे तुम्ही केसांसाठी कांदा वापरू शकता.
१. कांदा बारीक चिरून घ्या आणि तो मिक्सरमध्ये घालून त्याची अगदी बारीक पेस्ट करा. यानंतर एका सुती कपड्यातून ही पेस्ट गाळून घ्या. आता जो कांद्याचा रस जमा झाला असेल त्यामध्ये रोजमेरीची पानं किंवा रोजमेरी तेलाचे काही थेंब आणि ५ ते ६ लवंग घाला. आठवड्यातून दोन वेळा हे पाणी केसांच्या मुळाशी शिंपडून हलक्या हाताने मसाज करा.
२. दुसरा उपाय करण्यासाठी मिक्सरमधून वाटलेली कांद्याची पेस्ट घ्या. जेवढी कांद्याची पेस्ट असेल तेवढेच त्यात खोबरेल तेल घाला. आता हे मिश्रण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. ५ ते ६ मिनिटे हे तेल चांगलं उकळून घ्या. त्यानंतर ते थंड होऊ द्या आणि नंतर गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा. या तेलाने आठवड्यातून दोन वेळा डोक्याला मालिश करा. काही दिवसांतच केस गळणं कमी होऊन त्यांची चांगली वाढ झालेली दिसेल.
