Alum for body odor : तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल की, बाहेर निघाल्यावर बस, रेल्वेच्या गर्दीत लोकांच्या घामाची दुर्गंधी जीव कासावीस करते. तुमच्याही घामाची दुर्गंधी इतरांना त्रास देत असेल. उन्हाळ्यात सगळ्यांनाच ही समस्या होते. कारण या दिवसांमध्ये घाम खूप जातो आणि दुर्गंधीसाठी जबाबदार बॅक्टेरिया अधिक तयार होतात. महत्वाची बाब म्हणजे फक्त डिओ, परफ्यूम किंवा पावडर वापरून ही दुर्गंधी दूर होत नाही. अशात तुम्हाला ही समस्या दूर करण्यासाठी एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. यासाठीचा बेस्ट उपाय म्हणजे वर्षानुवर्षे वापरली जाणारी तुरटी. पण अनेकांना तुरटीचा वापर कसा करावा हे माहीत नसतं. तेच जाणून घेऊ.
तुरटीचा वापर फार आधीपासून त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. कारण तुरटी एक नॅचरल अॅन्टी-सेप्टीक आहे. त्वचेला फायदा मिळण्यासोबतच तुरटीनं घामाची दुर्गंधी दूर करण्यासही सुद्धा फायदा मिळतो. पण हे अनेकांना माहीत नसतं.
तुरटी एक नॅचरल डिओड्रेंट
घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुरटीचं पावडर तयार करा. एक ग्लास पाण्यात एक चमचा तुरटी पावडरचं मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाका. रोज आंघोळ केल्यावर काखेत आणि घाम येणाऱ्या जागांवर हे मिश्रण स्प्रे करा. तुरटीचं हे मिश्रण लावाल तर घामाची दुर्गंधी अजिबात येणार नाही.
तुरटी फिरवा
घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही स्प्रे सोबतच इतरही पद्धतीनं तुरटी लावू शकता. यासाठी आंघोळ झाल्यावर तुरटी पाण्यात भिजवा किंवा काखेत थोडं पाणी लावा आणि त्यावर तुरटीची वडी फिरवा. यानंही तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
आंघोळीच्या पाण्यात टाका
तुरटीची वडी किंवा पावडर आंघोळीच्या पाण्यात टाका. या पाण्यानं आंघोळ केल्यास दुर्गंधीसाठी जबाबदार बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घामाची दुर्गंधी दूर होते. यासाठी आंघोळीच्या 10 ते 15 मिनिटं आधी आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे तुरटी पावडर टाका किंवा तुरटी फिरवा. आंघोळ केल्यावर कोरफडीचा गर बॉडीवर लावा.
तुरटीचे इतरही फायदे
फेसपॅक म्हणून लावा
तुरटी तुम्ही चेहऱ्यावर फेसपॅक म्हणूनही लावू शकता. यानं चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळते. यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडं मध टाका आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. या फेसपॅकनं त्वचा साफ होईल आणि त्वचा चमकदार दिसेल. फक्त कोरडी त्वचा असेल तर याचा वापर करू नये.
तोंडाची दुर्गंधी जाईल
अनेकांना तर हे माहीतच नाही की, तोडांची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी देखील तुरटीचा लावू शकता. यासाठी पाण्यात तुरटीचा तुकडा टाकून गरम करा आणि या पाण्यानं गुरळा करा.