सण उत्सव असले आणि बायकांनी साड्या नेसल्या नाहीत असं क्वचितच पाहायला मिळतं. ड्रेस, वनपीस, कुर्त्यांची कितीही फॅशन असली तरी साडीतील सौंदर्यं काही वेगळंच. आता गणशोत्सवाला सुरूवात झाली असून घरोघरच्या बायकांनी आपल्या खास साड्यांची घडी मोडायला सुरूवात केली असेल. तर काहींनी नवीन साड्या विकत घेतल्या असतील. एखादी महागडी साडी घेतली तर ती व्यवस्थित ठेवणंही तितकंच महत्वाचं असतं. लक्ष न दिल्यास साड्या खराब होतात. त्यामुळे पुन्हा नेसायची इच्छा राहत नाही. (Useful tips to take care of expensive sarees) सिल्कच्या साड्या वर्षानुवर्ष व्यवस्थित ठेवण्यसाठी काही टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.
साडी कशी स्वच्छ करायची?
सिल्क, काठापदराच्या साडीला तुम्ही नेहमी नेहमी ड्रायक्लिन करण्यासाठी देत नसाल तर घरीच शॅम्पूच्या पाण्यानं स्वच्छ धुवा. यामुळे साडीवर कोणताही डाग असेल तर तो सहज निघून जाण्यास मदत होते.
साडी स्वच्छ करण्याच्या इतर टिप्स
अर्धी बादली पाण्यात एक चमचा मीठ आणि एका लिंबाचा रस घाला. आता सिल्कची साडी ३० मिनिटांपर्यंत या पाण्यात भिजवून ठेवा. नंतर साध्या पाण्यात बुडवून पिळून घ्या.
कव्हरमध्ये ठेवा
साड्या वर्षानुवर्ष चांगल्या राहाव्यात यासाठी नेहमी त्या सुती कापडात बांधून कपाटात ठेवा. आजकाल बाजारात साड्यांच्या कव्हरर्समध्ये खूप ऑपश्नस मिळतात. त्यातील कोणतंही कव्हर तुम्ही साडी ठेवण्यासाठी वापरू शकता.
वास येऊ नये म्हणून काय करायचं?
ज्या दिवशी ऊन पडलं असेल तर त्या दिवशी सिल्कच्या साड्या उन्हात ठेवाव्यात यामुळे साड्यांना वास येत नाही. पण जास्तवेळ कडक उन्हात साड्या ठेवू नका अन्यथा रंग उडण्याची शक्यता असते.
हँगरची निवड कशी कराल
कधीही सिल्कची साडी लोखंडाच्या किंवा लाकडाच्या हँगरला लावू नका. यामुळे साडीला डाग लागू शकतात. सिल्कची साडी ठेवण्यासाठी नेहमी प्लास्टिकच्या किंवा फायबरच्या हँगरचा वापर करा. यामुळे साडी चांगली, सुरक्षित राहिल.
डाग काढून टाकण्यासाठी काय कराल
सिल्कच्या साडीवर लिपस्टिक, तेल किंवा कॉस्मॅटिक्सचे डाग लागले असतील तर टॅल्कम पावडर लावून डाग सुकवा. त्यानंतर स्वच्छ कापडानं किंवा टिश्यू पेपरनं पुसून घ्या.
टम्बल ड्राय करू नका
शक्य असल्यास साड्या नैसर्गिकरित्या सुकवण्याचा प्रयत्न करा. वॉशिंग मशिनमध्ये टम्बल ड्राय कधीही करू नका.
रगडून साफ करू नका. सिल्कच्या साड्यांना गरजेपेक्षा जास्त रगडून धुवू नका, जास्त पिळूही नका. असं केल्यानं या साड्यांची चमक कमी होऊ लागते.
माईल्ड डिटर्जेंटचा वापर
सिल्कची साडी नेसून झाल्यानंतर त्यात घाम लागलेला असू शकतो. म्हणून आधी साडी हवेत सुकवा. वाटल्यास माईंल्ड डिटर्जेंटनंही तुम्ही साडी स्वच्छ करू शकता. सिल्कची साडी बाहेर ठेवल्यानं तिचा रंग उडू शकतो. सिल्कच्या साड्यांची चमक कायम राहण्यासाठी स्वच्छ जागी कपाटात ठेवा.