Join us

How to stop hair fall : केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 11:44 IST

How to stop hair fall : कमीत कमी खर्चात घरच्याघरी या टिप्सचा वापर करून तुम्ही सुंदर, लांबसडक केस मिळवू शकता. 

केस गळण्याची समस्या सध्या सर्वाधिक महिलांमध्ये उद्भवते. शॅम्पू वापरून वेगवेगळ्या हेअर ट्रिटमेंट्स करूनही फायदा होत नाही.  सध्याची व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्यातील अनिमितता, शरीरात पोषक घटकांचा अभाव यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. सौंदर्यतज्ज्ञ शेहनाज हुसैन यांनी केस गळणं थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. कमीत कमी खर्चात घरच्याघरी या टिप्सचा वापर करून तुम्ही सुंदर, लांबसडक केस मिळवू शकता. 

नारळाचं तेल

केसांची चमक आणि आरोग्य राखण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल वापरावे. शहनाज हुसैन ते लावण्याची योग्य पद्धत सांगत आहेत. त्यानुसार, खोबरेल तेल हलके गरम करा. आता या तेलाने टाळूला मसाज करा. हे तेल मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत चांगले लावा आणि जास्त दाबाने मसाज करू नका. हे तेल एका तासासाठी डोक्यावर ठेवल्यानंतर शॅम्पू करा.

नारळाचं दूध

नारळाचे दूध घ्या आणि त्यात काही थेंब पाणी मिसळा. आता हे मिश्रण तुमच्या डोक्यावर लावा, विशेषत: जेथे केस हलके होत आहेत किंवा जेथे केस वेगाने गळत आहेत. हे मिश्रण रात्रभर टाळूवर सोडा आणि नंतर दुसऱ्या दिवशी केस धुवा. यामुळे तुमच्या डोक्यावर नवीन केसांची वाढही सुरू होईल आणि केस चमकदार, चांगले  होतील. 

शहनाज हुसैन यांच्यामते हेल्दी फॅट्स , खनिजे आणि प्रथिनं केसांच्या चांगल्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. नारळाचं तेल किंवा नारळाचं दूध या पोषक तत्वांनी भरपूर असल्यानं तुमचे केस चांगले राहण्यास मदत होईल. नारळाच्या दुधात पोटॅशियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात आढळतात. जे केसांचे नुकसान, केस तुटणे आणि केस गळणे नियंत्रित करते. म्हणून, आपण आपल्या केसांमध्ये नारळाचे दूध आणि नारळाचे तेल दोन्ही वापरू शकता.

लसूण

शहनाज हुसैनच्या म्हणण्यानुसार, लसणाच्या काहीपाकळ्या घेऊन त्यांना बारीक करा आणि ही पेस्ट नारळाच्या तेलात मिसळून थोडी गरम करा. जेव्हा हे तेल थंड होईल, तेव्हा ते आपल्या केसांच्या मुळांमध्ये मसाज करा आणि 30 मिनिटे सोडा. नंतर शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा. लसणामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, जे केसांना पुन्हा वाढण्यास मदत करते. हे कारण आहे की प्राचीन काळापासून लसणाचा वापर केसांच्या वाढीसाठी औषधांमध्ये केला जात आहे.

कांद्याचा रस

शहनाज सांगतात की कांद्याचा रस योग्य प्रकारे लावल्याने केसांना झटपट फायदा होतो. तुम्ही 1 कांदा चिरून मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या आणि रस काढा. हा रस फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी केसांच्या मुळांवर लावा आणि नंतर सौम्य शॅम्पू करा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा केसांमध्ये कांद्याचा रस लावा. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुमचे केस गळणे झपाट्याने कमी होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी