केसांना तेल लावणे हा भारतीय संस्कृतीतील केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, हे तेल किती वेळा लावावे आणि कोणत्या परिस्थितीत टाळावे, याबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा केस गळतीचा त्रासही होऊ शकतो आणि तेल लावूनही काही फायदा होत नाही. (How many times a week should you oil your hair)
किती वेळा तेल लावावे?
केसांच्या प्रकारानुसार आणि त्वचेच्या गरजेनुसार तेल लावण्याची वारंवारता बदलते. सामान्यतः, आठवड्यातून १ ते २ वेळा केसांना तेल लावणे पुरेसे असते. तुमचे केस खूप कोरडे किंवा निर्जीव असल्यास, तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तेल लावू शकता. यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळेल आणि त्यांचा कोरडेपणा कमी होईल. जर तुमचे केस किंवा टाळू (Scalp) नैसर्गिकरित्या तेलकट असेल, तर आठवड्यातून एकदा किंवा फक्त केसांच्या टोकांना (Ends) तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. जास्त तेल लावल्यास टाळूवर तेल जमा होऊन मुरुम किंवा कोंड्याची समस्या वाढू शकते.
तेल किती वेळ ठेवावे?
तेल लावल्यानंतर किमान एक तास आणि जास्तीत जास्त रात्रभर (Overnight) ठेवणे चांगले. तेल जास्त वेळ (उदा. दोन किंवा तीन दिवस) ठेवल्यास धूळ आणि प्रदूषण केसांवर जमा होते, ज्यामुळे टाळूचे छिद्र बंद होऊ शकतात आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते.
कधी तेल लावणं टाळावं?
काही विशिष्ट परिस्थितीत तेल लावणे टाळले पाहिजे. कोंडा/फंगल इन्फेक्शन असेल तर तेल लावू नका. जर तुम्हाला टाळूवर (Scalp) तीव्र कोंडा, बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) किंवा मुरुमे (Pimples) झाली असतील, तर तेल लावणे टाळा. तेल लावल्याने संसर्ग वाढू शकतो. या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.
केस खूप गळत असतील तर, टाळूवर हलका मसाज जरूर करा, पण तेल लावताना जास्त जोर लावून चोळू नका, अन्यथा गळती वाढू शकते. तुम्ही दिवसभर बाहेर धूळ, प्रदूषण किंवा उन्हात फिरणार असाल, तर सकाळी तेल लावून बाहेर पडणे टाळा. यामुळे धूळ केसांना चिकटून राहते. केस धुण्यापूर्वी लगेच तेल लावणं टाळा. केस धुण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी तेल लावण्याने विशेष फायदा होत नाही. तेल लावताना ते कमीतकमी १ तास तरी टाळू आणि केसांना मुरू देणे आवश्यक आहे.
