थंडीचे दिवस सुरू झाले की सगळ्यात आधी आपल्या त्वचेला जपावं लागतं. कारण या दिवसांत असणाऱ्या कोरड्या वातावरणाचा परिणाम लगेचच आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्वचा कोरडी पडून भुरकट दिसू लागते. त्वचेला खाज यायला लागते. तळपायांची तर खूप काळजी घ्यावी लागते. पाय लगेचच काळवंडून जातात आणि तळपायांना भेगा पडलेल्या दिसतात. पायांचा कोरडेपणा आणि तळपायांच्या भेगा वाढू नयेत यासाठी घरच्याघरी फूटमास्क तयार करता येतो. तो कसा तयार करायचा, पायांना कशा पद्धतीने लावायचा आणि त्यामुळे पायांना नेमका काय फायदा होऊ शकतो ते पाहूया..(Homemade Foot Mask For Feet)
तळपायांसाठी फुटमास्क कसा तयार करायचा?
चेहऱ्यासाठी जसा फेसमास्क असतो, केसांसाठी हेअरमास्क असतो, तसाच पायांसाठी फुटमास्क असतो. तो तयार करण्यासाठी आपल्याला २ प्लास्टिकच्या पिशव्या लागणार आहेत.
सगळ्यात आधी तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थोडं खोबरेल तेल टाका. त्यात थोडं ग्लिसरीन आणि थोडं गुलाब पाणी टाका. ग्लिसरीन आणि खोबरेल तेल हे दोन्ही पदार्थ त्वचेला माॅईश्चराईज करून हायड्रेटेड ठेवतात.
त्यानंतर त्यामध्ये ॲलोव्हेरा जेल आणि कॉफी पावडर घाला. कॉफीमुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
आता यामध्ये थोडा मध घाला. मधदेखील त्वचेसाठी अतिशय उत्तम असतो. त्वचा छान हायड्रेटेड आणि मॉईश्चराईज ठेवतो. आता सगळे पदार्थ टाकल्यानंतर पिशवी हातानेच बाहेरून चोळा आणि सगळे पदार्थ मिक्स करून घ्या. आता ही पिशवी सॉक्सप्रमाणे पायात घाला. ती हलकंसं रबर लावून पॅक करा. यानंतर पायात तुमचे नेहमीचे सॉक्स किंवा बूट घाला. अर्धा तास पाय तसेच त्या पिशवीमध्ये राहू द्या. तोपर्यंत तुम्ही तुम्हाला पाहिजे ती सगळी कामं करून घ्या. यानंतर पाय पिशवीतून काढा. ते प्युमिक स्टोन वापरून घासून घ्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा. पाय छान होतील.
