Eyebrow Dandruff : डोक्यातील केसांमध्ये होणाऱ्या कोंड्याची काळजी खूप जास्त घेतली जाते. पण शरीरातील इतर भागांमध्ये येणाऱ्या केसांमधील कोंड्याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. असाच एक भाग म्हणजे भुवया. भुवयांमध्ये अनेकदा कोंडा होतो. पण याकडे ड्राय स्किनची समस्या समजून दुर्लक्ष केलं जातं, मात्र तज्ज्ञांच्या मते भुवयांवर दिसणारी पांढरी पापडी ही अनेकदा कोंडा किंवा सौम्य यीस्ट इन्फेक्शनमुळे होते. वेळेत लक्ष दिलं नाही तर खाज, लालसरपणा आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते. अशा वेळी काही सोपे उपाय उपयोगी ठरू शकतात.
भुवयांमध्ये कोंडा होण्याची कारणं?
कोंडा हा फक्त टाळूपुरताच मर्यादित नसतो. तो भुवयांच्या केसांच्या मुळांमध्येही होऊ शकतो. याची काही वेगवेगळी कारणं असतात. जसे की, थंड व कोरडे हवामान, हार्श फेसवॉश किंवा मेकअप प्रॉडक्ट्स, अॅलर्जी, त्वचेतील नैसर्गिक तेलांचा समतोल बिघडणे इत्यादी.
भुवयांमधील कोंडा कसा कमी कराल?
बदाम तेल
भुवयांमधील कोंडा कमी करण्यासाठी बदाम तेल बरंच फायदेशीर ठरतं. कोमट बदाम तेल घ्या आणि झोपण्यापूर्वी भुवयांवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे कोंडा कमी होते तसेच भुवयांचे केस मजबूत होतात. सकाळी चेहरा धुवून घ्या.
कोरफडीचा गर
कोरफडीचा गर त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. भुवयांवर कोरफडीचा गर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवा. त्यातील अँटी-फंगल गुणधर्म खाज आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.
कडूलिंबाचं तेल
कडूलिंबाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. थोड्या प्रमाणात कडूलिंबाचं तेल भुवयांवर लावल्यास मृत त्वचा आणि कोंड्याा थर हळूहळू निघून जातो. आठवड्यातून दोन वेळा वापर करणे फायदेशीर ठरते.
