Hibiscus Oil for Hair Growth: सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांचे केस लांब आणि काळे असावेत. पण आजकाल कमी वयातच केसगळतीच्या समस्येनं अनेक लोक हैराण आहेत. ज्यामुळे अनेकांचं लांब आणि काळ्या केसांचं स्वप्न स्वप्नच राहतं. अनेकजण काळे केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. पण त्यांपासून फायदा मिळण्याची काही गॅरंटी नाही. सोबतच पैसेही खूप खर्च होतात. केमिकल्समुळे केसांचं अधिक नुकसानही होतं. अशात केसांची वाढ होण्यासाठी एक नॅचरल उपाय मदत करू शकतो. केसांसाठी जास्वंदाचं फुल खूप फायदेशीर मानलं जातं. यातील व्हिटॅमिन आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सनं केसांची वाढ वेगानं होते.
जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आढळतं, जे केसगळती रोखण्यात मदत करतं. सोबतच यातील अमीनो अॅसिडनं केस मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच यातील अॅंटी-मायक्रोबिअल गुण केसांमधील कोंडा दूर करण्यास मदत करतात. अशात या फुलाचा केसांवर कसा वापर करावा हे जाणून घेऊ.
कसं बनवाल तेल?
केसांना जास्वंदाचं तेल लावण्यासाठी ८ ते १० जास्वंदाची फुलं आणि काही पानं घ्या. तसेच एक वाटी खोबऱ्याचं तेल घ्या. हे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी खोबऱ्याचं तेल एका भांड्यात गरम करा. गरम झालेल्या तेलात फुलं आणि पानं टाकून चांगली शिजू द्या. तेल १० ते १५ मिनिटं गरम केल्यावर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यावर एका बॉटलमध्ये स्टोर करा.
कसा कराल वापर?
हे तेल केसांना लावण्यासाठी हातावर २ ते ३ चमचे तेल घ्या. नंतर ते डोक्यावर लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. हे तेल साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवा. नंतर केस पाण्यानं धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलाचा वापर करा. काही दिवसात फरक दिसून येईल.