Join us  

Hemangi kavi : बाई, बुब्ज आणि ब्रा, अभिनेत्री हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट व्हायरल, ती विचारतेय काही सडेतोड प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 4:45 PM

Hemangi kavi : या पोस्टवर अनेक वाद प्रतिवाद टीका होताना दिसून येत आहेत तर खुलेपणानं आपले विचार मांडल्याने हेमांगीचे कौतुक पण होत आहे

ठळक मुद्देलोकांच्या मानसिकतेवर भाष्य करताना ती म्हणते की, टीशर्ट मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती नैसर्गिक पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही!  बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो!  याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींंशी काही संबंध नाही! अरे

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच आपले वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. आता तिने बाई, बुब्स आणि ब्रा यावर फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा होत असून ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.  या पोस्टवर अनेक वाद प्रतिवाद टीका होताना दिसून येत आहेत तर खुलेपणानं आपले विचार मांडल्याने हेमांगीचे कौतुक पण होत आहे

हेमांगी कवीने या पोस्टमध्ये लिहिले की, बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉइस असू शकतो!मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही! हाँ त्यावरून परिक्षण करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि गॉसिप करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा चॉइस!  

यानिमित्ताने सांगावसं वाटतं...ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती स्ट्रगल करायचाय हे लक्षात येतं!  आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक! 

लोकांच्या मानसिकतेवर भाष्य करताना ती म्हणते की, टीशर्ट मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती नैसर्गिक पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी!  ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कंम्फर्टेबल आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी काहीही! त्यांची चॉइस! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं? 

ब्राच्या वापराबाबत मुलींची बाजू मांडताना ती सांगते, किती तरी मुली ब्रा घालून ही निपल्स दिसतात म्हणून काय कायउपद्व्याप करतात...टीश्यूपेपर लावतात, निपल्स पॅड वापरतात, चिकट पट्टी लावतात... बाप रे!...कशासाठी एवढं आणि का? किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात. कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात ते जर त्याच 'लोग क्या कहेंगे' लोकांनां दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो! स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ती ब्रा घालून राहायचं आणि मग रात्री झोपेच्या वेळी 'काढण्याची मुभा' दिल्या सारखी काढून ठेवायची! त्यावेळी ही अंगावर ओढणी नाहीतर स्टोल असतोच! कश्यासाठी यार!, असे हेमांगीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही!  बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो!  याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींंशी काही संबंध नाही! अरे किती ती बंधनं? किती ते 'लोक काय म्हणतील' चं ओझं व्हायचं? अबे जगू द्या रे मुलींना, मोकळा श्वास घेऊ द्या!  खरंतर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं! स्वइच्छेने ब्रा न घालता वावरणे , दिसणारे निपल्स बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी!, असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेमांगी कवीव्हायरल फोटोज्सोशल व्हायरल