कोरोना झाल्यानंतर अनेक जणांना वेगवेगळे शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवत आहेत. यापैकी एक त्रास आहे मोठ्या प्रमाणावर होणारी केस गळती. कोरोना होऊन गेल्यानंतर ६ ते ७ महिने उलटून गेले तरीही खूपच जास्त केस गळत आहेत, अशी तक्रार आता अनेकजण करत आहेत. आधीच वाढते प्रदुषण, आहारात झालेला बदल, ताण- तणाव यामुळे केसगळती आणि केसांच्या इतर समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. त्यात पुन्हा कोविडने आणखी भर घातल्याने केसांची समस्या खूपच बिकट झाली असल्याचे अनेक जण सांगत आहेत.
का होते कोरोनानंतर केसगळती?
कोरोना झाल्यानंतर आजारातून बरे होण्यासाठी शरीरावर अनेक स्ट्राँग औषधांचा मारा केला जातो. या सगळ्या बदलांशी जुळवून घेताना शरीराला प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि प्रचंड उर्जा खर्च होते. आधीच कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती, अंगातली ताकद कमी झालेली असते. त्यामुळे शरीरालाच पोषण मिळाले नाही, तर केसांना तरी कुठून मिळणार. याचा परिणाम केसांवर होतो आणि केस नाजूक होऊन प्रचंड प्रमाणात केसगळती होऊ लागते. त्यामुळेही केसगळती रोखायची असेल तर सगळ्यात आधी अन्नातून आपल्याला पोषण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आहारात बदल करणे गरजेचे आहे.
आहारात करा फक्त हे ३ बदल
१. काळे मणूके
काळे मणुके अतिशय पोषक असतात. काळ्या मणुक्यांद्वारे खूप जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती मिळते. त्यामुळे केसगळती थांबविण्यासाठी हा उपाय जरूर करून पहावा. रोज रात्रभ १५ ते २० काळे मणुके पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी रिकाम्या पोटी बारीक चावून हे मणुके खावेत. यामुळे केसगळती खूपच लवकर कमी होऊ शकते.
२. आवळ्याचे सेवन वाढवा.
आवळा केसांसाठी पोषक असतो. कारण त्यामध्ये खूप जास्त व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, लोह असते. त्यामुळे केसांसाठी हे सगळेच खूप फायद्याचे आहे. त्यामुळे आवळ्याचा ज्यूस, चटणी, मुरांबा अशा वेगवेगळ्या पदार्थातून आवळा पोटात गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी. केसगळती अवघ्या काही दिवसातच कमी होते.
३. कढीपत्ता
कढीपत्त्यामध्ये बीटा-कैरोटिन, एंटी-ऑक्सीडेंट्स आणि अमीनो ॲसिड यांचे उत्तम प्रमाण असते. त्यामुळे कढीपत्ता खाणे अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी १ कप पाणी घ्यावे. त्यामध्ये १५ ते २० कढीपत्त्याची पाने टाका. हे पाणी चांगले उकळून घ्या. पाणी उकळून अर्धे झाले की गॅस बंद करा. दरराेज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. दोन- तीन आठवडे हा प्रयोग रोज केल्यास केसगळती कमी होते.