मानवी शरीरात त्वचेवर नैसर्गिकरित्या तेल तयार होते. हे तेल सेबेशस ग्रंथींमधून बाहेर पडते आणि केसांना तसेच टाळूला आर्द्र ठेवण्याचे काम करते. मात्र काही वेळा या ग्रंथी जास्त प्रमाणात सक्रिय होतात आणि त्यामुळे केसांच्या मुळाशी व टाळूवर अतिरिक्त तेल जमा होऊ लागते. (haircare tips, Even if you don't apply oil, your hair looks greasy and your face also gets oily? Do 10 simple things)यामागे अनेक कारणे असू शकतात. हार्मोन्समधील बदल, ताणतणाव, अनियमित आहार, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे, पुरेशी झोप न मिळणे किंवा आनुवंशिक कारणांमुळेही तेलकट स्काल्पची समस्या वाढू शकते. उन्हाळ्याच्या दिवसात घाम जास्त येतो तेव्हाही तेल आणि घाम एकत्र होऊन केस पटकन चिकट आणि निस्तेज दिसू लागतात. काही वेळा चुकीचे शॅम्पू किंवा केसांवर वारंवार केमिकल्स वापरण्याने टाळू आपले नैसर्गिक संतुलन गमावतो आणि संरक्षणासाठी अधिक तेल तयार करू लागतो.
यावर घरगुती उपाय सहज करता येतात. सर्वात पहिले म्हणजे आहारात बदल करणे. हलका, संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्यास शरीराचे आतून संतुलन राखले जाते. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचेची आणि टाळूची स्वच्छता व आर्द्रता टिकते. घरच्या घरी लिंबाचा रस आणि कोमट पाण्याने केस धुतल्यास टाळूवरील जास्त तेल कमी होते आणि केसांना पोषण मिळते. मेथीचा फायदा होतो तसेच आवळ्याचाही फायदा होतो. आवळा पूड पाण्यात भिजवून तयार केलेला लेप आठवड्यातून एकदा लावल्याने तेलकटपणा कमी होतो. तसेच टाळू निरोगी राहतो. कोरफडीचा गर थेट टाळूवर लावल्यास नैसर्गिक थंडावा मिळतो आणि सेबेशस ग्रंथींचे काम सुरळीत होते. नारळाचे किंवा ऑलिव्ह तेल खूप कमी प्रमाणात, फक्त मुळांना हलक्या हाताने लावावे. जास्त तेल वापरल्यास उलट चिकटपणा वाढतो.
महत्त्वाचे म्हणजे केस खूप वारंवार धुणे टाळावे. तसेच रासायनिक शाम्पू वापरणे टाळा. टाळू नखाने खाजवणे टाळावे कारण त्यामुळे ग्रंथी अधिक तेल निर्माण करु लागतात. एकूणच केस आणि टाळूवरील तेल हे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी जीवनशैलीत आणि आहारात केलेले छोटे बदल, तसेच साधे घरगुती उपाय वापरले तर हा त्रास सहज कमी करता येतो.