How to check if hair fall is normal: लांब, मुलायम, चमकदार केस आपल्या सौंदर्यात मोठी भर घालत असतात. सगळ्यांना असे सुंदर, लांब केस हवे असतात. पण आपल्याच काही चुकांमुळे ही इच्छा अपुरी राहते. बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि पोषणाच्या कमतरतेमुळे हल्ली केसगळतीची समस्या खूप जास्त वाढली आहे. कंगवा केसांमध्ये फिरवल्यावर, उशीवर किंवा बाथरूमच्या ड्रेनमध्ये केसच केस गोळा झालेले दिसतात. मग नक्कीच मनात अशी भीती येते की, इतके जाताहेत म्हणजे टक्कल तर पडणार नाहीये ना? अशात हे माहिती असणं गरजेचं आहे की, नॉर्मल केसगळती कशी ओळखावी किंवा कसं कळेल की, शरीरातील कोणत्या समस्येमुळे केसगळती होत आहे.
कधी नॉर्मल असते केसगळती?
हेल्थलाइनच्या एका रिपोर्टनुसार, दररोज ५० ते १०० केस गळणं पूर्णपणे सामान्य मानलं जातं. कारण आपलं शरीर सतत स्वतःला नवं करत असतं. शरीर सतत रिपेअर होत असतं. जशा त्वचेवरील मृत पेशी निघून जातात, तसाच टाळू जुने केस गळवून नव्या केसांसाठी जागा तयार करतो. आपल्या डोक्यावर सुमारे १ लाख केसांची मुळे असतात आणि प्रत्येक केसाचा वाढीचा सायकल वेगवेगळा असतो. त्यामुळे रोज काही केस गळणं नॅचरल आहे आणि त्याची चिंता करण्याची गरज नसते.
अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीनुसार, एका व्यक्तीचे दररोज जवळपास ५० ते १०० केस गळणं सामान्य बाब आहे. केसांचे फॉलिकल्स एका प्रोसेसमधून जात असतात. यात पहिली स्टेज एनाजेन असते, ज्यात केसांचा विकास होतो आणि त्यानंतर टेलोजेन स्टेज येते ज्याला रेस्ट स्टेजही म्हटली जाते. यात केसगळती सुरू होते. केसांची उगवण्याचं आणि गळण्याचं हे चक्र तोपर्यंत सुरू असतं जोपर्यंत रोम कूप सक्रिय राहतात आणि नवीन केस येत राहतात. सामान्यपणे निरोगी लोकांच्या डोक्यावर ८० हजार ते १२०,००० केस असतात. ज्या लोकांचे केस छोटे असतात त्यांना केसगळतीची समस्या कमी होते. लांब केस असलेल्या लोकांना ही समस्या अधिक असते.
अचानक खूप केस गळू लागल्यास काय?
कधी-कधी अचानक खूप प्रमाणात केस गळू लागतात. या स्थितीला टेलोजेन एफ्लुव्हियम असं म्हणतात. हा एक प्रकारचा तात्पुरता हेअर फॉल असतो, जो प्रामुख्याने ताणतणाव किंवा शारीरिक बदलांमुळे होतो. उदा. जास्त ताप, बाळंतपणानंतर, अचानक वजन कमी होणं अशा परिस्थितीत शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी केसांची वाढ थांबवतं. त्या वेळी केस लगेच गळत नाहीत, पण २–३ महिन्यांनंतर एकदम मोठ्या प्रमाणात गळू लागतात. दिलासादायक गोष्ट म्हणजे बहुतांश वेळा हा हेअर फॉल तात्पुरता असतो आणि काही काळाने केस पुन्हा वाढू लागतात.
कधी केस गळणं चिंतेचं कारण ठरतं?
- डोक्यावर गोलाकार टक्कल पडलेले पॅच दिसणे किंवा त्या ठिकाणी त्वचा खूप गुळगुळीत वाटणे, हे अॅलोपेशिया एरिएटाचे लक्षण असू शकतं.
- कपाळाजवळ केस मागे सरकणे किंवा भांग रुंद दिसू लागणे, हे पॅटर्न बॉल्डनेसकडे इशारा करतात.
- टाळूवर लालसरपणा, वेदना, जळजळ यांसोबत केस गळत असतील तर ते दुर्लक्षित करू नये.
- डोक्याच्या एखाद्या ठराविक भागातून केस गळत असतील आणि तिथे नवे केस येत नसतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
केसगळती थांबवण्याचे उपाय?
मेथी आणि दह्याचा हेअर मास्क
४ ते ५ चमचे मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी बिया गाळून घ्या आणि बारीक पेस्ट बनवा. नंतर मेथीच्या पेस्टमध्ये ४ चमचे दही मिक्स करा. हेअर पॅक तयार आहे. केसांना हा हेअर मास्क लावण्याआधी केस आधी शाम्पूनं चांगले धुवून घ्या. केस चांगले वाळल्यानंतर हा हेअर मास्क लावा. २ तासांनंतर केस शाम्पू आणि पाण्यानं धुवून घ्या.
मेथी आणि कोरफड
केसांच्या लांबीनुसार ४ ते ५ चमचे कोरफडीच्या गरात २ ते ३ चमचे मेथीच्या बियांची पेस्ट चांगली मिक्स ककरा. ही पेस्ट केसांना तासभर लावून ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या.
खोबऱ्याचं तेल आणि मेथी
केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात मेथीच्या बिया टाकून तेल उकडा. या तेलानं आठवड्यातून २ ते ३ वेळा मालिश करा. नक्कीच काही दिवसात फरक दिसेल.
