Join us

केसांतला कोंडा कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात, ५ सोपे उपाय, कोंडा होईल दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2023 15:53 IST

Hair Care Tips For Dandruff Problem : प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद काही महत्त्वाच्या टिप्स देतात.

केसांतला कोंडा ही अनेकींसाठी अतिशय वैताग आणणारी समस्या आहे. थंडीच्या दिवसांत तर ही समस्या इतकी वाढते की आपल्याला काय करावे समजत नाही. त्वचेचा कोरडेपणा, प्रदूषण, केमिकल्स असलेली उत्पादने आणि आहारातून न मिळणारे पोषण यामुळे कोंड्याची समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. कोंडा एकदा झाला की तो नियंत्रणात आणणे अतिशय जिकरीचे काम असते. कोंड्यामुळे केसांत खाज येणे, त्वचेच्या खपल्या पडणे, अंगावर -कपड्यांवर कोंडा पडणे आणि पिंपल्ससारख्या समस्याही निर्माण होतात. मात्र या समस्यांपासून सुटका करायची असेल तर आपल्याला सगळ्यात आधी कोंड्यावर नियंत्रण आणावे लागेल. त्यासाठी प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद काही महत्त्वाच्या टिप्स देतात. या टिप्स कोणत्या ते पाहूया (Hair Care Tips For Dandruff Problem)....

१. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोक्याची त्वचा कायम स्वच्छ ठेवा. खूप कोंडा असेल तर आठवड्यातून ३ ते ४ वेळा केसांची त्वचा स्वच्छ होईल असा प्रयत्न करा. हे करतानाही ज्या शाम्पूमध्ये किमान २ टक्के केटोकोनाझोल किंवा झिंक पायरिथिओन असेल असाच शाम्पू वापरा.  

(Image : Google)

२. खूप कोंडा असेल तर आपण जास्त तेल लावतो जेणेकरुन कोरडेपणा कमी होईल. पण कोंडा झाला असल्याच डोक्याला कोणत्याच प्रकारचे तेल अजिबात लावू नये.

३. कंगवा वापरताना तो स्वच्छ आहे की नाही याची खात्री करायला हवी. ठराविक काळाने कंगवा अवश्य साफ करायला हवा. तसेच दुसऱ्यांचे कंगवे वापरणे टाळायला हवे. त्यामुळे कोंडा वाढण्याचीच शक्यता जास्त असते. 

४. केसांत सतत घाम येत असेल तर केस नियमितपणे धुवायला हवेत. अनेकदा आपल्याला व्यायाम केल्यावर किंवा मैदानी खेळ खेळल्यावर भरपूर घाम येतो. हा घाम तसाच डोक्यात राहिल्यास कोंडा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे घाम आला असेल तर डोकं लगेच धुवायला हवे.

५. बरेचदा बाहेर ऊन असल्याने आपण डोक्यावर हॅट किंवा कॅप घालतो. पण अशाप्रकारे कॅप घातली आणि आपल्याला खूप घाम येत असेल तर मात्र कॅप घालणे टाळावे, अशावेळी उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्याला सुती रुमाल बांधावा किंवा चक्क उन्हात जाणे टाळावे.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीत्वचेची काळजी