Join us

काॅफी आवडते तर फक्त पिऊ नका, चेहऱ्यालाही लावा! काॅफी स्क्रबचे 3 प्रकार,त्वचा नितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 17:43 IST

मूड चांगला होण्यासाठी उपयोगी असलेली काॅफी त्वचेसाठीही फायदेशीर असते. काॅफी स्क्रबमुळे त्वचा स्वच्छ होण्यापासून तरुण दिसण्यापर्यंत अनेक फायदे होतात.

ठळक मुद्देकाॅफी स्क्रबमधील कॅफिनमुळे त्वचेवरील काळे डाग निघून जातात.त्वचेवरील तेलकटपणा घालवण्यासाठी काॅफी स्क्रबचा उपयोग होतो.त्वचेवरील सुरकुत्या निघून जाण्यासाठी काॅफी स्क्रबचा उपयोग होतो. 

सकाळी उठल्यानंतर किंवा दिवस भरात काॅफी पिण्याची सवय अनेकांना असते. काॅफी पिल्याने मूड फ्रेश होतो, ऊर्जा मिळते. मूडसाठी उपयोगी असलेली काॅफी त्वचेसाठीही फायदेशीर असते. त्वचेच्या अनेक समस्या काॅफीने ( पिऊन नव्हे काॅफी चेहऱ्याला लावून) सुटतात.  काॅफीमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस मोठ्या प्रमाणात असतात त्याचा फायदा त्वचा निरोगी होण्यास होतो. तसेच काॅफीमुळे त्वचेची लवचिकता वाढते. त्वचेशी निगडित समस्या काॅफी स्क्रबच्या सहाय्याने सहज सुटतात. काॅफी स्क्रबमुळे त्वचा स्वच्छ होण्यापासून तरुण दिसण्यापर्यंत अनेक फायदे होतात. 

Image: Google

1. चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी, डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी  काॅफी स्क्रब करण्यासाठी काॅफी पावडर, नारळाची साखर ( कोकोनट शुगर), ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस घ्यावा. या तिन्ही गोष्टी नीट एकत्र कराव्यात. हे मिश्रण चेहऱ्यावर गोलाकार मसाज करत लावावं. मसाज केल्यानंतर 5-7 मिनिटानंतर चेहरा थंडं पाण्यानं धुवावा. काॅफी स्क्रबमुळे त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो. काॅफी स्क्रबमधील कॅफिनमुळे डोळ्यांखालचा काळेपणा निघून जातो. 

Image: Google

2. त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी काॅफी स्क्रबचा उपयोग होतो. तेलकटपणा घालवणारं काॅफी स्क्रब करण्यासाठी काॅफी पावडर, खोबऱ्याचं तेल, मध आणि लिंबाचा रस घ्यावा. हे सर्व नीट मिसळून  चेहऱ्यावर गोलाकार मसाज करत लावावं.  5-7 मिनिटं मसाज केल्यानंतर थोडा वेळ लेप चेहऱ्यावर राहू द्यावा. नंतर चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा. या स्क्रबमुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जातो आणि त्वचा स्वच्छ होते. 

Image: Google

3. त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी काॅफी स्क्रबचा उपयोग होतो. काॅफी आणि दही एकत्र करुन हे मिश्रण चेहऱ्यावर मसाज करत लावावं. नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. या काॅफी स्क्रबमुळे त्वचा मऊ होते, उजळते.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी