Join us

केसांमध्ये अडकून बसलाय चिवट, चिकट कोंडा? करा एक असा उपाय जो कायमची सोडवेल समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:33 IST

Dandruff Home Remedy : कोंड्याची ही समस्या काही घरगुती उपायांनीच दूर केली जाऊ शकते. असाच एक उपाय डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी सांगितला आहे.

Hair Care Tips : केसांमध्ये कोंडा होणं ही एक कॉमन समस्या आहे. महिला असो वा पुरूष कुणाच्याही केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. केसांची योग्य काळजी न घेणे, प्रदूषण, जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे, वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करणे आणि जास्त तणाव या कारणांमुळे कोंडा अधिक वाढतो. पण कोंड्याची ही समस्या काही घरगुती उपायांनीच दूर केली जाऊ शकते. असाच एक उपाय डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी सांगितला आहे.

डॉ. नीरा नाथन या सांगतात की, केसांमधील कोंडा किंवा ऑयली केसांची समस्या दूर करण्यासाठी आठवड्यातून १ ते २ वेळा केसांना अ‍ॅपल व्हिनेगर लावायला हवं. याचा वापर करण्यासाठी थोडं अ‍ॅपल व्हिनेगर आणि केस धुता - भिजवता येतील इतकं पाणी घ्यावं. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून केसांवर स्प्रे करा. काही मिनिटे हे पाणी तसंच राहू द्या आणि नंतर केस धुवून घ्या. काही दिवसात तुम्हाला कोंडा कमी झालेला दिसेल.

इतर उपाय

दही आणि लिंबाचा रस

कोंडा दूर करण्यासाठी आपण केसांना केवळ दही लावू शकता किंवा त्यात थोडा लिंबाचा रसही टाकू शकता. लिंबू आणि दही एकत्र करून लावले तर केसांना आवश्यक पोषण मिळतं. २ चमचे दह्यात १ चमचा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण केसांवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून दोनवेळा हा उपाय तुम्ही करा.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

बेकिंग सोड्यात लिंबाचा रस टाकून केसांना लावल्याने डोक्यातील फंगस किंवा डोक्याच्या त्वचेवरील कोंडा दूर होतो. २ चमचे बेकिंग सोड्यात आणि ३ चमचे लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावून मालिश करा. याने कोंडाही दूर होतो आणि डोकं खाजवणंही बंद होतं.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स