White Hair Problem In Kids And Teenagers : केस पांढरे होणं ही काही आता केवळ वाढत्या वयाची समस्या राहिलेली नाही. आजकाल कमी वयातही लोकांचे केस पांढरे होतात. २० ते ३० वयोगटातील लोकांचेही केस पांढरे होतात. त्यापेक्षाही कमी वयात केस पांढरे होतात. लहान मुलांमध्ये ही समस्या दिसली की, पालक चिंतेत असतात. आपल्या मुलाला एखादा आजार तर झालेला नाही ना? असा प्रश्नही त्यांना पडतो.
मुलांचे केस पांढरे होत असल्याचं पाहून पालक लगेच त्यांच्यावर वेगवेगळे उपचार करतात. वेगवेगळे केमिकल्स आणि औषधांचा वापर केला जातो. पण अशी घाई करून ही समस्या दूर होणार नाही. त्यासाठी आधी केस पांढरे होण्याचं कारण जाणून घेणं फायदेशीर ठरेल. तेव्हाच योग्य ते उपाय करू शकला.
कमी वयात केस पांढरे होण्याची कारणं
कमी वयात लहान मुलांचे केस पांढरे होण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. ही कारण लाइफस्टाईल सोबतच कौटुंबिकही असू शकतात. तीच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आनुवांशिक
जर आई-वडील किंवा परिवारातील इतर लोकांचे केस कमी वयातच पांढरे होत असतील तर लहान मुलांचे केस पांढरे होण्याची समस्या होऊ शकते.
पोषक तत्वांची कमतरता
शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी झालं तर बालपणीच केस पांढरे होण्याची समस्या होऊ शकते. तसेच व्हिटॅमिन डी, झिंक आणि कॉपरही कमी झाल्यावर वेळेआधीच केस पांढरे होतात.
स्ट्रेसमुळे पांढरे होतात केस
लहान मुलं जर नेहमीच तणावात राहत असतील आणि टेंशनमध्ये राहत असतील तर त्यांचे केस कमी वयातच पांढरे होऊ शकतात.
काय कराल उपाय?
- कमी वयातच केस पांढरे होत असतील तर लहान मुलांच्या आहारावर लक्ष देणं गरजेचं असतं. त्यांना भरपूर पोषण देणारा आहार द्यायला हवा.
- शरीरात केरोटीन वाढणाऱ्या पदार्थांचा अधिक समावेश करा. केरोटीन मिळवण्यासाठी नट्स्, बीन्स आणि डाळी भरपूर खाऊ घाला.
- फार जास्त शाम्पू किंवा केमिकल्सचा वापर टाळायला हवा. यानं समस्या अधिक वाढू शकते.
- मुलांना फार जास्त वेळ उन्हात राहू देऊ नका. यानं केस डॅमेज होतात आणि वेळेआधीच पांढरे होतात.
- व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डी देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.