आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी दडलेल्या असतात, ज्या आपल्या सौंदर्यासाठी उपयुक्त ठरतात. पण आपल्याला त्यांचा नेमका कसा उपयोग करायचा हे ठाऊक नसतं. अशाच अनेक पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे खजूर. आरोग्यासाठी खजूर तर आपण नेहमीच खातो. आता त्वचेसाठी खजूराचा उपयोग करून बघा. खजूरामध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे खजूर त्वचेसाठी देखील अतिशय पोषक आहे. खजूराचा फेसपॅक बनवून तो नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार आणि तजेलदार बनते.
कसा करायचा खजूराचा फेसपॅक?- खजूर फेसपॅक बनविण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी सगळ्यात आधी तीन ते चार खजूर घ्या आणि त्यांच्यातल्या बिया काढून टाका.- हे खजूर रात्री दुधात भिजत टाका. - यानंतर सकाळी या मिश्रणामध्ये एक चमचा साय टाका आणि ते मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या.- यामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस टाका. अशा पद्धतीने खजूर फेसपॅक तयार झाला.
कसा लावायचा खजूर फेसपॅक?तयार केलेला फेसपॅक हलक्या हाताने गोलाकार फिरवत चेहऱ्यावर लावा. यानंतर हा फेसपॅक सुकेपर्यंत तो चेहऱ्यावर राहू द्यावा. फेसपॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा.
खजूर फेसपॅक लावण्याचे फायदे- खजूर फेसपॅक चेहऱ्यावर आठवड्यातून दोनदा लावल्याने खूपच चांगला परिणाम दिसून येतो.- यामुळे कोरड्या, रूक्ष त्वचेला नवी चकाकी मिळते.- खजूर फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या खूप कमी होते.- टॅनिंग झाले असल्यास हा फेसपॅक उत्तम ठरतो.- त्वचा मऊसर होते आणि खूप चांगल्या पद्धतीने टोन होते.