Join us

चेहऱ्यावर काळे डाग? सोपा उपाय, आल्याचा रस लावा! 'ही' त्याची नेमकी रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 13:40 IST

आल्याचा रस आरोग्यासाठी जेवढा उपयुक्त आहे, तेवढाच तो त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग घालविण्यासाठी आल्याचा रस लावण्याचा सोपा उपाय करून बघा.

ठळक मुद्देआल्यामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स आणि झिंक असल्यामुळे ते त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

आल्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आपल्या आहारात आल्याचा सहभाग असणे किती आवश्यक आहे, हे आपण सगळे जाणताेच. असाच आल्याचा उपयोग तुमच्या त्वचेसाठीही करा. कारण आल्यामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स आणि झिंक असल्यामुळे ते त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्वचेवरचे मुरमांचे डाग किंवा डार्क सर्कल्स घालविण्यासाठी आपण अनेक महागडे उपाय करतो. वेगवेगळे कॉस्मेटिक्स खरेदी करतो. बऱ्याचदा या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतोच, असं नाही. त्यामुळे घरच्याघरी हा सोपा आणि फायदेशीर ठरणारा उपाय करून बघा. आल्याचा रस त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे आजकाल अनेक ॲण्टी एजिंग क्रिममध्येही आल्याचा रस वापरण्यात आल्याचं सांगण्यात येतं. 

 

१. पिंपल्स येऊ नये म्हणून....चेहऱ्यावर पिंपल्स येणं, ही समस्या खूपच कॉमन आहे. या समस्येवर खात्रीशीर उपाय म्हणजे आल्याचा रस. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम येत असतील तर त्यासाठी एक टेबलस्पून आल्याचा रस घ्या. यामध्ये एक टेबलस्पून दूध टाका. त्यानंतर कापसाच्या बोळ्याच्या मदतीने हा लेप अलगदपणे चेहऱ्यावर लावा. ५ ते १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय एक दिवसाआड करावा. जर आल्याचा लेप लावल्यानंतर चेहऱ्याची जळजळ झाली, तर लगेच चेहरा धुवून टाकावा. 

 

२. आल्याचा फेस स्क्रबचेहऱ्यावरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी हा घरच्या घरी करता येण्यासारखा एक सोपा उपाय आहे. हा फेस स्क्रब बनविण्यासाठी दोन टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घ्या. यामध्ये बारीक चिरलेले अद्रक टाका आणि दोन टेबलस्पून साखर टाका. हे मिश्रण बारीक वाटून घ्या. चेहऱ्यावर गोलाकार हात फिरवत हा लेप लावा. यानंतर १० ते १५ मिनिटे हा स्क्रब चेहऱ्यावरच सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्याने चेहरा तजेलदार दिसतो आणि त्वचा नितळ होते.

 

३. आले आणि मधचेहऱ्यावरील मुरुमांचे प्रमाण वाढले असेल, तर आले आणि मधाची पेस्ट एकत्र करून चेहर्‍यावर लावावी. ही पेस्ट तयार करण्यासाठी आले किसून घ्यावे तसेच आले आणि मध यांचे प्रमाण सारखेच ठेवावे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि १५ मिनिटे चेहऱ्यावर सुकू द्यावी. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाकावे. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास मुरुमांचा त्रास कमी होतो. 

 

४. डोळ्यांभोवतीची काळी वर्तूळेडोळ्यांभोवतीची काळी वर्तूळे कमी करण्यासाठी आल्याचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी आल्याचा रस आणि दही हे दोन्ही सारख्या प्रमाणात घ्यावे आणि त्याची पेस्ट बनवून ती डोळ्यांभोवती लावावी. हा लेप डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. आठवड्यातून दोनदा किंवा तिनदा हा उपाय केल्यास डोळ्यांभोवतीची काळी वर्तूळे लवकरच कमी होतात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सत्वचेची काळजी